गुरुदेव समंतभद्र शाळेत विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप महसूल प्रशासनाचा उपक्रम; पालकांची गैरसोय टळली
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील : वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्या मंदिर गुरुकुल शाळेत महसूल प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध दाखल्यांचे वाटप आज मंगळवारी करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांना शाळेतच अर्ज भरून आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध झाल्याने त्यांची शासकीय कार्यालयांच्या फेऱ्यांपासून सुटका झाली. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे व नायब तहसीलदार प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी वेरूळचे सरपंच प्रकाश पाटील, मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर व मंडळ अधिकारी लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले. कार्यक्रमास शिंदेसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख सुधाकर दहिवाल, तलाठी भूषण रोजेकर, किशोर कुलकर्णी, मनीषा कदम, केंद्रचालक संदीप औटे, संगीता दहिवाल, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
