कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित “सिल्क स्कॅनर” ठरणार
रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान
ऍग्रो हॅकथॉन स्पर्धेत श्री दिलीप हाके यांचा गौरव
छत्रपती संभाजीनगर :- भारतातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या ऍग्रो हॅकथॉन स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन सादर करून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे निवृत्त रेशीम उपसंचालक श्री दिलीप हाके यांना महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चषक, सन्मानपत्र आणि १५ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
श्री हाके यांनी विकसित केलेले “सिल्क स्कॅनर” हे अत्याधुनिक उपकरण भविष्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरणार असल्याचे मत कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पेक्ट्रोमिती संवेदक आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले हे उपकरण रेशीम कोषांची गुणवत्ता अचूकपणे तपासण्यास सक्षम आहे.
सध्या बाजारपेठेत रेशीम कोषांची किंमत व्यापाऱ्यांकडून कोष हातात घेऊन अंदाजाच्या आधारे ठरवली जाते. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही. या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आलेले “सिल्क स्कॅनर” हे यंत्र रेशीम कोषांचे वैज्ञानिक परीक्षण करून शेतकऱ्यांना पारदर्शक व योग्य दर मिळवून देण्यास मदत करणार आहे.
या यंत्राच्या सहाय्याने एका किलोमधील रेशीम कोषांची संख्या, कोषातील रेशमाचे प्रमाण, कोषांची गुणवत्ता, आकारमान तसेच इतर महत्त्वाचे मापदंड काही क्षणांत तपासता येणार आहेत. त्यामुळे रेशीम खरेदी-विक्री प्रक्रियेत पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे.
विशेष म्हणजे, या उपकरणामध्ये आवश्यक तांत्रिक बदल करून इतर विविध शेतमालाची गुणवत्ता तपासण्यासाठीही त्याचा उपयोग करता येणार असल्याचे श्री हाके यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
श्री दिलीप हाके यांच्या या अभिनव संशोधनामुळे महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाला नवी दिशा मिळणार असून, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
