‘उमगलेले गांधी’ अभिवाचनातून महात्मा गांधींच्या विचारांचा जागर
‘जिगीषा नाट्यसहवास २०२६’ महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर :- मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिगीषा नाट्यसहवास २०२६’ महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी एमजीएम परिसरातील आइनस्टाईन सभागृहात ‘उमगलेले गांधी’ या विषयावर अभिवाचनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि नागरिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि दिग्दर्शिका प्रतिमा जोशी यांनी महात्मा गांधी यांच्यावरील निवडक लेखांचे प्रभावी अभिवाचन करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
महत्त्वाच्या लेखांचे अभिवाचन
या विशेष कार्यक्रमात गांधीजींच्या जीवनकार्यावर आणि विचारांवर प्रकाश टाकणाऱ्या विविध नामवंत लेखकांच्या साहित्याचे सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील लेखांचा समावेश होता:
-
वि. स. वाळिंबे यांचा ‘मूठभर मीठ’
-
स. ज. भागवत यांचा ‘अखंड जीवनाचे उपासक महात्मा गांधी’
-
सुरेश द्वादशीवार यांचा ‘गांधीजी आणि सशस्त्र क्रांतिकारक’
-
श्रीपाद केळकर यांचा ‘छोडो भारत घोषणेचा जन्म’
-
नरहर कुरुंदकर यांचा ‘श्री गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी’
कवितांच्या माध्यमातून समकालीन संदर्भांची मांडणी
कार्यक्रमादरम्यान कुसुमाग्रजांची ‘अखेर कमाई’ ही कविता सादर करण्यात आली. ‘मध्यरात्र उलटल्यावर, शहरातील पाच पुतळे, एका चौथऱ्यावर बसले, आणि टिपं गाळू लागले’ या ओळींच्या माध्यमातून महात्मा गांधींसह महापुरुषांच्या विचारांचे जातीय आणि संकुचित चौकटीत होणारे विभाजन अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. पुढे गांधींच्या भूमिकेवर भाष्य करताना, ‘तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जातजमात तरी, तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र, फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!’ या ओळींनी उपस्थितांना गंभीरपणे अंतर्मुख केले.
कार्यक्रमाचा समारोप
कार्यक्रमाचा समारोप बा. सी. मर्ढेकर यांच्या कवितेने करण्यात आला. ‘होती वेडी आशा, फुटेल आभाळाचा कर्मठ सांधा, पडेल किंवा तडा भयंकर, वसुंधरेच्या अर्ध्या अंगा’ या ओळींनी आजच्या काळात महात्मा गांधींच्या विचारांची असलेली नितांत गरज ठळकपणे अधोरेखित केली. या संपूर्ण अभिवाचनातून गांधींचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार आणि समकालीन संदर्भातील त्यांचे महत्त्व उपस्थितांसमोर प्रभावीपणे उलगडले.
