राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात
तुर, मुग, उडीद, बाजरी व नाचणी पिकांसाठी शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ
विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत खरीप हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम राबविण्यात येत असून छत्रपती संभाजीनगर विभागातील तीनही जिल्ह्यांसाठी लक्षांक प्राप्त झाला आहे. पिकांची उत्पादकता वाढविणे, सुधारित व संकरीत वाणांचा प्रसार करणे तसेच बियाणे बदलाचा दर वाढविणे या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानाच्या तृणधान्य घटकांतर्गत विभागासाठी १० वर्षांच्या आतील वाणांच्या बाजरी पिकासाठी २,४१० क्विंटल व नाचणी पिकासाठी १०० क्विंटल, असा एकूण २,५१० क्विंटल प्रमाणित बियाणे वितरणाचा लक्षांक प्राप्त झाला आहे. या बियाण्यांसाठी प्रति क्विंटल ३ हजार रुपये अनुदान देय आहे. तसेच भरडधान्य घटकांतर्गत १,२८५ क्विंटल बियाणे वितरणाचा लक्षांक असून किमतीच्या ५० टक्के अथवा कमाल १० हजार रुपये प्रति क्विंटल या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे.
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ५ वर्षांच्या आतील वाणांसाठी तुर पिकाचे २,७०० क्विंटल, मुग पिकाचे १,४१० क्विंटल व उडीद पिकाचे २,२५० क्विंटल असे लक्षांक निश्चित करण्यात आले आहेत. तसेच ५ वर्षांपेक्षा अधिक व १० वर्षांच्या आतील वाणांसाठी तुर पिकाचे २,३७० क्विंटल, मुग पिकाचे १,४५० क्विंटल आणि उडीद पिकाचे ३,५९० क्विंटल प्रमाणित बियाणे वितरणाचे लक्षांक प्राप्त झाले आहेत. ५ वर्षांच्या आतील बियाण्यांसाठी प्रति क्विंटल ६ हजार रुपये तर ५ ते १० वर्षांच्या आतील बियाण्यांसाठी प्रति क्विंटल ३ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी कमाल एक हेक्टर क्षेत्रापुरते मर्यादित राहणार आहे. महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको आदी बियाणे पुरवठादार संस्थांच्या अधिकृत वितरकांमार्फत ७/१२ उताऱ्याच्या आधारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) तत्त्वावर प्रमाणित बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केले आहे.
