पी एम किसान योजना बंद झाल्याने शेतकऱ्याचा उपोषणाचा इशारा
घनसावंगी/प्रतिनिधी/ पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत मिळणारे हप्ते अचानक बंद झाल्याने घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु. येथील दोन शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत रावसाहेब परसराम गंभीरे व आनंद लक्ष्मण मिसाळ या शेतकऱ्यांनी तहसीलदार, घनसावंगी यांना निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, त्यांच्या नावावर पिंपरखेड बु. येथील गट क्रमांक 403 व 54 मधील शेती असून संबंधित जमिनीवर पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित मिळत होते. मात्र, कोणतेही स्पष्ट कारण न देता हप्ते अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात अनेक वेळा संबंधित कार्यालयांकडे पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे बंद पडलेले हप्ते तात्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.