अय्युब पठाण यांच्या ” कौतुकाची थाप ” कथेचा चौथीच्या अभ्यासक्रमात समावेश
पैठण/प्रतिनिधी/ हारून शेख राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बालभारतीच्या अभ्यासक्रमाची निर्मिती जून २०२६ पासून करण्यात आलेली आहे.यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या मराठी माध्यमातील पाठयपुस्तकात छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील लोहगाव ता. पैठण येथील प्रसिध्द व लोकप्रिय साहित्यिक श्री. अय्युब पठाण लोहगावकर यांच्या ” कष्टाच्या वाटा ” या बालकथा संग्रहातील प्रेरणादायी आणि संस्कारक्षम, शैक्षणिक मूल्यांवर आधारीत ” कौतुकाची थाप ” या कथेचा येत्या जून पासून चौथीच्या अभ्यासक्रमात समावेश बालभारतीने केला आहे.
नवीन वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी चौथीच्या पाठयपुस्तकाची बालभारतीच्या नेमलेल्या तज्ञ समितीकडून निर्मिती केलेली असून विद्यार्थी यांच्या अध्ययन निष्पतीवर आधारीत कौशल्याधिष्ठित शिक्षणावर अधिक भर देण्यात आलेला आहे. मराठवाडयातील प्रसिध्द साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने योग्य दखल घेऊन श्री.अय्युब पठाण यांच्या ” कौतुकाची थाप ” या कथेचा समावेश इयत्ता चौथीच्या पाठयपुस्तकात करण्यात आलेला आहे. येत्या जून पासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असून अय्युब पठाण लोहगावकर यांचा शैक्षणिक व साहित्यक्षेत्राकडून अभिनंदन होत आहे.
बँन्डमास्टर चे शाळामास्तर झालेले अय्युब पठाण हे सध्या सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांच्या वयाच्या दुप्पट म्हणजे १२० विविध सेवाभावी सेवा आणि संघटना यांचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार अय्युब पठाण लोहगावकर यांना प्राप्त झालेले आहे. श्री. अय्युब पठाण हे गेल्या चाळीस वर्षापासून मराठीभाषेत सातत्याने लेखन करून त्यांची आठ बालकवितासंग्रह, चार बालकथासंग्रह, तीन प्रौढ कवितासंग्रह आणि एक ललीतलेखसंग्रह अशी त्यांनी रससरशीत साहित्य संपदाची निर्मिती केलेली आहे. पाठयपुस्तकात त्यांच्या ” कौतुकाची थाप ” या पाठाचा समावेश झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.