Homeऔरंगाबादडॉक्टरांवरील हल्ल्यांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही; सनी देओल यांच्या ‘सूर्या’ चित्रपटावर महाराष्ट्रात...

डॉक्टरांवरील हल्ल्यांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही; सनी देओल यांच्या ‘सूर्या’ चित्रपटावर महाराष्ट्रात निर्बंध घाला!

डॉक्टरांवरील हल्ल्यांचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही; सनी देओल यांच्या ‘सूर्या’ चित्रपटावर महाराष्ट्रात निर्बंध घाला!

ॲड. महेश धन्नावत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; डॉक्टरांच्या सन्मानासाठी पुढाकार,उच्च न्यायालयातही चित्रपटावर आक्षेप
जालना/प्रतिनिधी/ रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे चित्रपटाच्या माध्यमातून उदात्तीकरण करणे समाजासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे अभिनेता सनी देओल यांच्या आगामी ‘सूर्या : अंत से आरंभ तक’ या चित्रपटातील डॉक्टरांविरोधातील कथित आक्षेपार्ह दृश्ये व संवाद वगळल्याशिवाय चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनावर कायद्यानुसार निर्बंध घालावेत, अशी मागणी जालन्यातील विधिज्ञ ॲड. महेश धन्नावत यांनी सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
         या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धी दृश्यांमध्ये डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे कथित प्रसंग दाखविण्यात आले असून, डॉक्टर अनावश्यक वैद्यकीय तपासण्या करतात, दलाली घेतात व भ्रष्टाचार करतात, अशा स्वरूपाचे चित्रण असल्याचा आक्षेप वैद्यकीय संघटनांनी घेतला आहे. यामुळे संपूर्ण वैद्यकीय व्यवसायाविषयी समाजात अविश्वास निर्माण होण्याची तसेच डॉक्टरांवरील हिंसाचाराला अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.
         या प्रकरणी पंजाबमधील खासगी रुग्णालये व परिचर्या गृहांच्या संघटनेने पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती त्रिभुवन दहिया यांच्यासमोर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने चित्रपटाच्या प्रमाणनाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या आक्षेपांचा कायद्यानुसार विचार करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाची नोंद घेऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली.
        या पार्श्वभूमीवर ॲड. धन्नावत यांनी डॉक्टरांच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देत महाराष्ट्र शासनानेही या विषयाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी असंख्य रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी संघर्ष केला. अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा कोणतीही आणीबाणी असो, डॉक्टर हेच सर्वप्रथम मदतीसाठी धावून येतात. अशा जीवनरक्षकांवर हल्ले करणाऱ्या व्यक्तींना चित्रपटात नायक म्हणून सादर करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
        “वैद्यकीय क्षेत्रात एखाद्या व्यक्तीकडून गैरप्रकार झाला असेल तर त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे. मात्र काही व्यक्तींच्या चुकीमुळे संपूर्ण डॉक्टर समाजाला भ्रष्ट ठरविणे आणि डॉक्टरांवरील हिंसाचाराला पराक्रमाचे स्वरूप देणे हा अत्यंत चुकीचा संदेश आहे. डॉक्टर हे समाजाचे शत्रू नसून जीवनरक्षक आहेत. रुग्णांना न्याय मिळालाच पाहिजे; पण डॉक्टरांचा सन्मान आणि सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे,” असे ॲड. महेश धन्नावत यांनी स्पष्ट केले.
        सनी देओल यांच्यासारख्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या चित्रपटांचा तरुण पिढीवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक जबाबदारीचेही भान ठेवणे आवश्यक आहे. चित्रपटातील कथित आक्षेपार्ह दृश्यांची योग्य तपासणी करून आवश्यक सुधारणा होईपर्यंत महाराष्ट्रात चित्रपटाच्या प्रदर्शनावर कायदेशीर निर्बंध घालण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
        “डॉक्टरांवरील हिंसाचार हा मनोरंजनाचा विषय होऊ शकत नाही. कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या समाजात न्याय हा न्यायालयातून मिळाला पाहिजे, मारहाणीतून नव्हे. डॉक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळू नये, यासाठी शासनाने वेळीच योग्य पावले उचलली पाहिजेत,” असेही ॲड. धन्नावत यांनी नमूद केले. दरम्यान, ‘सूर्या’ चित्रपटाचे प्रदर्शन २० नोव्हेंबर रोजी प्रस्तावित असून, डॉक्टरांच्या आक्षेपांबाबत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ कोणता निर्णय घेते आणि महाराष्ट्र शासन ॲड. धन्नावत यांच्या निवेदनावर काय भूमिका घेते, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments