Homeऔरंगाबादआकड्यांच्या पलीकडचे योगदान : महावितरणच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा – लेखा विभाग आंतरराष्ट्रीय लेखा दिन (१०...

आकड्यांच्या पलीकडचे योगदान : महावितरणच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा – लेखा विभाग आंतरराष्ट्रीय लेखा दिन (१० नोव्हेंबर) विशेष

आकड्यांच्या पलीकडचे योगदान : महावितरणच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा – लेखा विभाग
आंतरराष्ट्रीय लेखा दिन (१० नोव्हेंबर) विशेष

         एखादी संस्था किती मोठी आहे, तिचे कार्यक्षेत्र किती व्यापक आहे किंवा तिची आर्थिक उलाढाल किती आहे, यापेक्षाही त्या संस्थेचे आर्थिक व्यवहार किती शिस्तबद्ध पद्धतीने चालतात, हे अधिक महत्त्वाचे असते. प्रत्येक खर्चाची नोंद, प्रत्येक उत्पन्नाचा हिशेब, निधीचा योग्य विनियोग आणि आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकता या बाबी संस्थेच्या विश्वासार्हतेशी थेट संबंधित असतात. ही जबाबदारी पार पाडणारा लेखा विभाग हा कोणत्याही संस्थेच्या व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
             लेखांकनाचा इतिहास मोठा रंजक आहे. इटालियन गणितज्ञ लुका पाचिओली (Luca Pacioli) यांनी १० नोव्हेंबर १४९४ रोजी प्रकाशित केलेल्या Summa de Arithmetica या ग्रंथात दुहेरी नोंद लेखांकन पद्धतीचे (Double Entry Bookkeeping System) सविस्तर वर्णन केले. ही पद्धत त्यांनी निर्माण केली नव्हती मात्र तिचे शास्त्रशुद्ध दस्तऐवजीकरण करून लुका पाचिओली यांनी लेखांकन क्षेत्राला महत्त्वाचे योगदान दिले. म्हणूनच त्यांना ‘Father of Accounting’ म्हणून ओळखले जाते. आज लेखांकनाचे स्वरूप पारंपरिक वही खात्यांपासून अत्याधुनिक डिजिटल प्रणालींपर्यंत पोहोचले असले, तरी अचूकता आणि पारदर्शकतेची त्यामागील मूलभूत तत्त्वे बदललेली नाहीत. या क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लेखा दिन साजरा केला जातो.

महावितरण आणि लेखा संवर्ग:-

         महावितरणचे कार्यक्षेत्र आणि आर्थिक व्यवहारांची व्याप्ती लक्षात घेता लेखा विभागाची जबाबदारी किती व्यापक आणि महत्त्वपूर्ण आहे, याची कल्पना येते. राज्यातील लाखो ग्राहकांना वीजपुरवठा करताना वीज खरेदी, ग्राहकांकडून महसूल वसुली, कृषी वीज अनुदान, शासकीय योजनांचा निधी, पायाभूत सुविधांवरील खर्च, अधिकारी/कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तसेच कंत्राटदारांची देयके अशा असंख्य आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करावे लागते. या सर्व व्यवहारांचे अचूक लेखांकन, आर्थिक नियोजन, वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, आर्थिक विवरणपत्रे सादर करणे, लेखापरीक्षणातील आक्षेपांचे निराकरण करणे तसेच महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) विविध प्रक्रियांमध्ये आर्थिक माहिती सादर करणे अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या लेखा संवर्ग पार पाडतो. थोडक्यात, महावितरणची आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवण्यात लेखा संवर्गाचे योगदान अनन्यसाधारण आहे.

      लेखा विभागाचे काम केवळ आकडेवारी तयार करणे किंवा आर्थिक नोंदी पूर्ण करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. कंपनीची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे, उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल कसा आहे, कोणत्या बाबींवर अधिक खर्च होत आहे आणि भविष्यात कोणती आर्थिक आव्हाने निर्माण होऊ शकतात, याचे चित्र व्यवस्थापनासमोर मांडण्यात या विभागाची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेत लेखा संवर्गाने दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त ठरते.

बदलत्या काळातील नवी आव्हाने:-

       महावितरणने यावर्षीपासून १० नोव्हेंबर हा दिवस “लेखा दिन” म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल महावितरणच्या प्रशासनाचे शतशः आभार. गेल्या काही वर्षांत लेखांकनाच्या कामात मोठे बदल झाले आहेत. संगणकीकृत लेखा प्रणाली, ERP, डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन अहवाल, वेगवेगळे Apps यांमुळे कामकाजाचा वेग वाढला आहे. मात्र, त्याचबरोबर अचूकतेची अपेक्षा आणि जबाबदारीही वाढली आहे. आर्थिक नियमांमधील बदल, वाढता कामाचा व्याप आणि मर्यादित मनुष्यबळ यांचा विचार करता लेखा संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोठा कामाचा ताण असतो.
        या परिस्थितीत केवळ पारंपरिक लेखांकनाचे ज्ञान पुरेसे नाही. बदलत्या तंत्रज्ञानाचे ज्ञान, आर्थिक नियमांची अद्ययावत माहिती आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन या बाबीही आवश्यक झाल्या आहेत. त्यामुळे या संवर्गासाठी नियमित प्रशिक्षण, आधुनिक तांत्रिक सुविधा, पुरेसे मनुष्यबळ आणि पदोन्नतीच्या योग्य संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यांच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदारी लक्षात घेऊन त्यांच्या व्यावसायिक विकासाकडेही गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे.

योगदानाची जाणीव आणि सन्मान :-

        महावितरणमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तांत्रिक अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष क्षेत्रात सातत्याने काम करतात. त्याच वेळी या संपूर्ण व्यवस्थेचे आर्थिक नियोजन आणि व्यवहारांचा ताळमेळ राखण्याची जबाबदारी लेखा संवर्ग पार पाडत असतो. दोन्ही कामे वेगवेगळी असली, तरी कंपनीच्या कामकाजासाठी ती एकमेकांना पूरक आहेत.
लेखा विभागाचे काम अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येत नाही. मात्र, प्रत्येक आर्थिक निर्णयामागे, प्रत्येक आर्थिक विवरणपत्रामागे आणि कंपनीच्या आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेमागे या संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान असते. त्यांच्या कामातील अचूकता, अनुभव आणि जबाबदारीची जाणीव कंपनीच्या आर्थिक शिस्तीसाठी मोलाची ठरते.
कोणत्याही संस्थेच्या प्रगतीमध्ये विविध विभागांचे योगदान असते. त्यामध्ये लेखा संवर्गाचे स्थानही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली जाणे आणि त्यांच्या अडचणींचा सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहारांची अचूकता ही केवळ लेखांकनाची गरज नसून संस्थेच्या विश्वासार्हतेची पायाभरणी आहे. ही पायाभरणी अधिक मजबूत करण्याचे काम लेखा संवर्ग सातत्याने करीत आहे.

         आंतरराष्ट्रीय लेखा दिनानिमित्त महावितरणसह सर्व क्षेत्रातील लेखा अधिकारी व कर्मचारी बंधू–भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कर्तव्यनिष्ठेचा आपापल्या संस्थेच्या प्रगतीसाठी असाच उपयोग होत राहो, ही सदिच्छा.
– 
डॉ. शिवाजी तिकांडे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments