Homeऔरंगाबादशेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठ्यासाठी आवश्यक कामे पूर्ण करा महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार...

शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठ्यासाठी आवश्यक कामे पूर्ण करा महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांचे निर्देश

शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठ्यासाठी आवश्यक कामे पूर्ण करा
महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांचे निर्देश


जालना : शेतीपंपांना दिवसा आठ तास सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी वीजवाहिन्यांच्या विलगीकरणाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. तसेच वीजबिल वसुली वाढविण्यासह स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांनी दिले.
        जालना मंडल कार्यालयात शनिवारी (दि.२४) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता युवराज जरग (जालना), बीना सावंत (पायाभूत आराखडा) यांच्यासह कार्यकारी अभियंते आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
         बैठकीत संचालक तालेवार यांनी शेतीपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा, वीजबिल वसुली, स्मार्ट मीटर बसविणे, पायाभूत सुविधांची कामे आणि विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा सविस्तर आढावा घेतला. शेतीपंपांना दिवसा आठ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजवाहिन्यांच्या विलगीकरणाची आवश्यक कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करा.
        ग्राहकसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याची कामे गतीने करावीत. वीजबिल वसुलीचा उपविभागनिहाय आढावा घेताना असमाधानकारक वसुली असलेल्या ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वसुलीत अपेक्षित सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
        आरडीएसएस, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि पायाभूत आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. कामे करताना कंत्राटदारांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी आणि सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश संचालक तालेवार यांनी दिले.
        स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना, पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना–२.० या योजनांचे फायदे ग्राहकांना समजावून सांगा आणि जास्तीत जास्त ग्राहकांच्या अर्जांची नोंदणी करा. तसेच ग्राहकांच्या बिलिंग व वीजपुरवठ्याच्या प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करा, असे निर्देश संचालक तालेवार यांनी यावेळी दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments