आझाद हिंद सेनेची स्थापना हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक टप्पा
पाचोड/प्रतिनिधी/ येथील शिवछत्रपती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आझाद हिंद सेना स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेले योगदान, त्यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने केलेला संघर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सैनिकांनी केलेला त्याग यांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. तुकाराम गावंडे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. तुकाराम गावंडे म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून सशस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारला. भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची प्रबळ आकांक्षा निर्माण करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे अनेक भारतीयांमध्ये देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा निर्माण झाली.
स्वातंत्र्य हे केवळ एक स्वप्न नव्हते, तर त्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार असलेल्या क्रांतिकारकांचा तो दृढ संकल्प होता, असे त्यांनी नमूद केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या त्यागामुळे आणि संघर्षामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले. नेताजींचे विचार, त्यांची देशभक्ती आणि राष्ट्राप्रती असलेली निष्ठा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून देशसेवेची भावना जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे म्हणाले की, आझाद हिंद सेनेचे वैशिष्ट्य म्हणजे या सेनेमध्ये केवळ पुरुष सैनिकांचाच सहभाग नव्हता, तर महिलांसाठीही स्वतंत्र बटालियन स्थापन करण्यात आली होती. या बटालियनचे नाव ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे होते. महिलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करून त्यांनाही स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेण्याची संधी देण्याचे ऐतिहासिक कार्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले.
नेताजींनी आपल्या जहाल राष्ट्रवादी विचारांतून भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची नवचेतना निर्माण केली. त्यांचे नेतृत्व, धैर्य, त्याग आणि राष्ट्राप्रती असलेली निष्ठा भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहील. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष तरुण पिढीला राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याची प्रेरणा देतो. विद्यार्थ्यांनी देशाच्या इतिहासाची जाणीव ठेवून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीची मूल्ये आत्मसात करावीत, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवाजी यादव यांनी केले, तर प्रा. सचिन कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.