जालना शहरातील सर्व प्रभागांत डेंग्यू प्रतिबंधक मोहीम राबवा!
सामाजिक कार्यकर्ते राहुल करनाडे यांचे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन; १३० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या
जालना/प्रतिनिधी/ शहरातील लोधी मोहल्ला परिसरात डेंग्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील सर्व प्रभागांमध्ये विशेष आरोग्य सर्वेक्षण, स्वच्छता मोहीम आणि डास नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल सत्यनारायण करनाडे यांनी केली आहे. यासंदर्भात जालना शहर महानगरपालिकेचे नगर सचिव केशव कानपूडे यांना निवेदन देण्यात आले असून, निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जालना यांना सादर करण्यात आली आहे. या मागणीला सुमारे १३० नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दिला आहे.
लोधी मोहल्ला परिसरात डेंग्यूमुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार, आणखी एका बालकाचा आणि एका बालिकेचा डेंग्यू तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोघांना उपचारासाठी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, विशेषतः बालकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात शहरातील सर्व प्रभागांमध्ये विशेष आरोग्य सर्वेक्षण राबविणे, तापाची लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून आवश्यक तपासण्या करणे, तसेच नाले, गटारे, रिकामे भूखंड, बांधकामस्थळे आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची तपासणी करून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, आवश्यकतेनुसार अळीनियंत्रण व कीटकनाशक फवारणी करणे, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये डेंग्यू प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे, संशयित व निदान निश्चित झालेल्या रुग्णांच्या नोंदींबाबत आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय साधणे, तसेच प्रत्येक प्रभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
सात दिवसांत प्राथमिक कार्यवाहीचा, तर पंधरा दिवसांत प्रभागनिहाय कार्यवाहीचा लेखी अहवाल द्या, अशी मागणी राहुल करनाडे यांनी केली आहे. महानगरपालिका प्रशासनाने निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही न झाल्यास प्रचलित कायदे व नियमांचे पालन करून शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.