करमाड पोलिसांची धडक कारवाई; आरोपी शेतमालकावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
आत्ताच एक्सप्रेस
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गाढेजळगाव शिवारात कपाशीच्या पिकामध्ये बेकायदेशीररीत्या केलेली गांजाची लागवड करमाड पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणली. या धडक कारवाईत पोलिसांनी सुमारे १८ लाख १९ हजार ५०० रुपये किमतीची ४३० लहान-मोठी गांजाची झाडे जप्त केली असून, शेतमालक श्रीराम रघुनाथ कोरडे (वय ५०, रा. गाढेजळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कपाशीच्या आड गांजाची शेतीगाढेजळगाव हद्दीतील गट क्रमांक ३३३ मधील शेतात कपाशीच्या पिकात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांना खबऱ्यामार्फत मिळाली. यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सम्राटसिंग व्ही. राजपूत यांनी या घटनेची नोंद तात्काळ स्टेशन डायरीमध्ये करून, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन केले.
महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) कृष्णा कारभारी घुगे आणि ग्रामपंचायत शिपाई नितीन सोनवणे या दोन शासकीय पंचांना सोबत घेऊन, तसेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) पथकासह पोलिसांनी शेतावर छापा टाकला. पाहणीदरम्यान कपाशीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून लावलेली अंदाजे ३ ते ४ फूट उंचीची आणि फुले आलेली गांजाची झाडे ठिकठिकाणी आढळून आली. एफएसएल पथकाने घटनास्थळीच प्राथमिक तपासणी करून ही झाडे गांजाचीच असल्याचे निष्पन्न केले.
पोलिसांनी शेतातील लहान-मोठी अशी एकूण ४३० गांजाची झाडे मुळासकट उपटून काढली. इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर त्यांचे वजन केले असता ते ७२ किलो ७८० ग्रॅम भरले. प्रति किलो २५ हजार रुपये बाजारभावानुसार या मुद्देमालाची किंमत १८ लाख १९ हजार ५०० रुपये इतकी होते. रासायनिक तपासणीसाठी झाडे व शेतातील मातीचे नमुने ताब्यात घेऊन उर्वरित झाडे ९ पोत्यांमध्ये भरून पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आली. या संपूर्ण कारवाईचे छायाचित्रण व चित्रीकरण करण्यात आले.या प्रकरणी आरोपी शेतमालक श्रीराम रघुनाथ कोरडे याच्याविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा (NDPS Act) १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(i) व २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सम्राटसिंग व्ही. राजपूत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ एल. ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक गणेश पी. वाघ, पोहेकॉ जयसिंग नागलोत, शिवाजी मदेवाड, सोपान डकले, संतोष चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार श्रीकांत तळेगावे, शुकुल बनकर, महादेव धोत्रे, अमोल मारकवाड (सर्व करमाड पोलीस ठाणे) आणि महसूल अधिकारी कृष्णा घुगे व एफएसएल पथकातील प्रतीक दरेकर यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
कपाशीच्या आड गांजा पिकवण्याचा हा गैरप्रकार समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हा गांजा नेमका कुठे आणि कोणाला विकला जाणार होता, या दिशेने करमाड पोलीस पुढील तपास करत आहेत.