Monday, October 5, 2026
Homeऔरंगाबादआठवडी बाजारातील शौचालयासाठी नगर परिषदेसमोर तरंग कांबळे यांचे 'सरणावर' बेमुदत उपोषण सुरूच;...

आठवडी बाजारातील शौचालयासाठी नगर परिषदेसमोर तरंग कांबळे यांचे ‘सरणावर’ बेमुदत उपोषण सुरूच; नगर परिषदेचे पत्र फेटाळले!

आठवडी बाजारातील शौचालयासाठी नगर परिषदेसमोर तरंग कांबळे यांचे ‘सरणावर’ बेमुदत उपोषण सुरूच; नगर परिषदेचे पत्र फेटाळले!

“मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही”; उपोषणकर्ते तरंग कांबळे आक्रमक, नगर परिषदेचे काम प्रगतीपथावर असल्याचे दावे अमान्य
अंबड/प्रतिनिधी/ अंबड शहरातील आठवडी बाजार परिसरातील मंजूर सार्वजनिक शौचालय व मुतारीचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी लहुजी क्रांती सेनेचे मराठवाडा प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार तरंग लक्ष्मणराव कांबळे यांनी आज, ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून नगर परिषद अंबड कार्यालयासमोर ‘सरणावर’ बसून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी नगर परिषद प्रशासनाने पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली असली, तरी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचा हा दावा फेटाळून लावत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नगर परिषदेचे पत्र व दावा काय?
       उपोषणाची दखल घेत नगर परिषद, अंबडचे मुख्याधिकारी यांनी दि. ०५/१०/२०२६ (जा.क्र./न.प./अंबड/कार्या-६./२०२६/१०४७) रोजी तरंग कांबळे यांना अधिकृत पत्र जारी केले. या पत्रात नगर परिषदेने म्हटले आहे की,
“अंबड शहरातील आठवडी बाजारात सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधण्याचे रु. १५,२२,१२९/- चे काम मेसर्स कृष्णा ए. कोरडे यांना दि. १४/०८/२०२५ अन्वये देण्यात आले असून, ११/०५/२०२६ च्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराने काम सुरू केले असून काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे बेमुदत उपोषण मागे घेऊन नगर परिषदेस सहकार्य करावे.”
“मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहील” – उपोषणकर्त्यांचे रोखठोक उत्तर!
नगर परिषदेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर उपोषणकर्ते तरंग कांबळे यांनी पत्रावरच स्वतःच्या स्वाक्षरीसह हस्तलिखित उत्तर लिहून प्रशासनाचा दावा धुडकावून लावला आहे. त्यांनी पत्रावर स्पष्ट लिहिले की :-
> “दिलेल्या निवेदनाप्रमाणे माझ्या सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्यात. मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहील!”
> काय आहेत मुख्य मागण्या?
     कामात प्रदीर्घ विलंब व निष्काळजीपणा करणाऱ्या जुन्या कंत्राटदाराचे टेंडर रद्द करून नवीन ई-निविदा प्रक्रिया राबवावी, जबाबदार कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, कामाचे निश्चित वेळापत्रक द्यावे आणि काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय करावी, या प्रमुख मागण्यांवर तरंग कांबळे ठाम आहेत.प्रशासनाच्या खोट्या आश्वासनांवर आता विश्वास ठेवणार नाही, असा पवित्रा घेत तरंग कांबळे यांनी उपोषण चालूच ठेवल्याने नगर परिषद प्रशासनाची धांदल उडाली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments