डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी
IMA जालना शाखेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन; खंडणी, धमक्या व सोशल मीडियावरील बदनामी रोखण्याची मागणी
जालना/प्रतिनिधी/ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), जालना शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. ५ ऑक्टोबर) पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन जालना शहरातील खासगी रुग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक व आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढत्या धमक्या, खंडणीचे प्रकार, सोशल मीडियावरील बदनामी तसेच सुरक्षेबाबत निवेदन सादर केले.
निवेदनात खासगी रुग्णालयांना लक्ष्य करून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धमकावणे, ब्लॅकमेल करणे, उपचाराची बिले बुडविण्यासाठी दबाव आणणे, रुग्णाशी संबंध नसलेल्या व्यक्तींनी रुग्णालयात हस्तक्षेप करणे तसेच खोट्या तक्रारी करून डॉक्टरांना त्रास देण्याच्या प्रकारांकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
तसेच कोणतीही चौकशी न करता सोशल मीडियावर डॉक्टरांची एकतर्फी बदनामी करणाऱ्या मजकुरावर आळा घालण्याची मागणी करण्यात आली. अशा प्रकारांमुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, भयमुक्त वातावरणात वैद्यकीय सेवा देण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक संरक्षण द्यावे, अशी मागणी IMAच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी खंडणी व धमक्यांच्या घटनांमध्ये कठोर कारवाई, देयक भरण्याबाबत धमकी देणाऱ्यांवर कारवाई, अनधिकृत व्यक्तींच्या हस्तक्षेपावर नियंत्रण आणि सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुरावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.