महावितरण कंपनीला 15 लाखाचा चुना लावणाऱ्या 30 वीज ग्राहकांवर गुन्हा दाखल
टेंभुर्णी/प्रतिनिधी/ जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणने धडक मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. तात्पुरता विद्युत पुरवठा खंडित असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापरणाऱ्या 30 ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ग्राहकांनी महावितरण कंपनीचे एकूण 15 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी महावितरणच्या टेंभुर्णी शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता शिवराज सुदाम शेप यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात रीतसर कायदेशीर फिर्याद दिली आहे.
जालना मंडळाचे माननीय अधीक्षक अभियंता यांच्या आदेशानुसार वीज चोरी रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत सहाय्यक अभियंता शिवराज शेप यांच्यासह वरिष्ठ तंत्रज्ञ सुभाष शेनफड कळंगे, किशोर रमेश पवार आणि परमेश्वर प्रकाश चव्हाण यांच्या पथकाने ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता टेंभुर्णी परिसरातील ग्राहकांची तपासणी केली. यावेळी एक वर्षापूर्वीपासून वीज खंडित केलेल्या काही ग्राहकांनी परस्पर रित्या आणि अनधिकृतपणे पुन्हा वीज पुरवठा जोडून वीज चोरी केल्याचे पथकाला आढळून आले.