Tuesday, September 29, 2026
Homeऔरंगाबादमहावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

छत्रपती संभाजीनगर :- महावितरणच्या वीजयंत्रणेमधील नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, तांत्रिक दुरुस्ती, वीजबिल वसुली किंवा मीटर काढणे यासारखी कामे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून करण्याची पूर्णतः जबाबदारी तारमार्ग संवर्गातील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहेत. अशी तांत्रिक व जोखमीची कामे करवून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करू नये. असे प्रकार आढळून आल्यास व विद्युत अपघात झाल्यास संबंधित दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध बडतर्फीसारखी कठोर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी नुकतेच परिपत्रक काढून क्षेत्रीय मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंत्यांना याबाबत खातरजमा करण्याचे आदेश दिले आहेत.

    महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे सुरक्षित संचालन, देखभाल व दुरुस्ती आणि ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे हे प्रत्येक संबंधित अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे. वीज यंत्रणेमध्ये प्रत्यक्ष कामे करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत तारमार्ग संवर्गामध्ये प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांवर नादुरुस्त वितरण रोहित्र बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीमधील बिघाड शोधणे, वीज पुरवठ्याच्या ग्राहक तक्रारी सोडवणे, वीजबिलांची वसूली करणे आणि थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढून आणणे यासारख्या कामांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

    तथापि, महावितरणचे काही तारमार्ग कर्मचारी ही कामे स्वतः करण्याऐवजी खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून घेत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहे. याबाबतच्या तक्रारी मुख्यालयस्तरावर प्राप्त झाल्या आहेत. महावितरणच्या वीजयंत्रणेतील कामांसाठी खासगी व अनधिकृत व्यक्तींचा वापर करणे अत्यंत गंभीर बाब आहे. अशा अनधिकृत व्यक्तींकडे पुरेसे तांत्रिक ज्ञान व सुरक्षेचे प्रशिक्षण नसते. त्यामुळे विद्युत व यांत्रिक अपघात घडून संबंधित खासगी व्यक्ती तसेच कर्मचाऱ्यांचा अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. याशिवाय वीज ग्राहक व महावितरणच्या मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागते.

     ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी (मेझर्स रिलेटिंग टू सेफ्टी अॅण्ड इलेक्ट्रिक सप्लाय) रेग्युलेशन्स २०२३‘ मधील नियम ३ नुसार केवळ अधिकृत व्यक्तीच वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करू शकते किंवा विद्युत वाहिन्या व उपकरणांवर काम करण्यास पात्र असते. त्यामुळे महावितरणकडून अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या किंवा अपात्र खासगी व्यक्तीस वीज यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचे काम करण्यास परवानगी देणे अथवा त्याच्याकडून काम करून घेणे हे पूर्णपणे बेकायदेशीर व अनधिकृत कृत्य आहे. तसेच महावितरणच्या सेवाविनियमांनुसार ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीत मोडते.

       या सर्व गंभीर बाबींची दखल घेत महावितरणचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी एका परिपत्रकाद्वारे कठोर निर्देश जारी केले आहेत. अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून काम केल्याचे किंवा अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीमुळे कोणतीही दुर्घटना, अपघात किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित प्रकरणी तात्काळ चौकशी करण्यात यावी असे निर्देश संचालक श्री. औंढेकर यांनी दिले आहेत. चौकशीअंती दोषी ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध सेवाविनियमातील तरतुदींनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्ती यासारखी कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. यासोबतच क्षेत्रिय कार्यालयातील मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंते यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणाच्या कामांमध्ये कुठल्याही परिस्थितीत खासगी व अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नाही याची वेळोवेळी खातरजमा करावी असे आदेशही संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments