जालना जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली; पावसाच्या खंडाने खरीप संकटात!
कापूस उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली; ऊस उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता — कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
जालना/प्रतिनिधी/ जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड तालुक्यासह ग्रामीण भागात पावसाने तब्बल महिनाभर दडी मारल्याने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगामातील पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाली असून, पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांवर पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम झाला असून, दुसरीकडे पाण्याअभावी ऊस पिकाच्या उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे.
कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, दोन-दोन खतांचे डोस, औषध फवारणी, आंतरमशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने हा संपूर्ण खर्च पाण्यात जाण्याची वेळ आली आहे. उत्पादन घटले तर शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न राहणार नसून कर्जाची परतफेड कशी करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पिके वाचविण्यासाठी पाणी नाही आणि केलेला खर्च वसूल होण्याची शक्यता नाही, अशी दुहेरी कोंडी शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे. ऊस उत्पादकांची परिस्थितीही गंभीर असून पाण्याअभावी उसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.