Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादअल्प पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान; विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा

अल्प पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान; विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा

अल्प पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान; विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी
जालना/प्रतिनिधी/ मराठवाड्यात जून व जुलै महिन्यात झालेल्या अत्यल्प व खंडित पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका यांसह खरीप पिके गंभीर संकटात सापडली आहेत. जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह विशेष आर्थिक पॅकेजद्वारे मदत द्यावी, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
     यासंदर्भात आमदार लोणीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देऊन मराठवाड्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे विहिरी व बोअरवेल आटत असून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
     शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ३१ जुलै २०२६ रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याची मुदत किमान १५ दिवसांनी वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाने सकारात्मक निर्णय घेत मुदतवाढ दिल्याबद्दल लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मात्र, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून केवळ मुदतवाढ पुरेशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    नुकसानग्रस्त सर्व पिकांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करावेत, पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मिळवून द्यावी, तसेच पीक विम्याच्या कक्षेबाहेर राहिलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
     याशिवाय सोयाबीनसह सर्व खरीप पिकांसाठी हेक्टरी विशेष नुकसानभरपाई द्यावी, पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन कर्जाचे पुनर्गठन करावे, पुढील हंगामासाठी बियाणे, खते व कृषी निविष्ठांसाठी विशेष मदत द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
    जनावरांसाठी चारा डेपो व चारा छावण्या सुरू करून पाण्याची व्यवस्था करावी. गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. तसेच परिस्थितीचा गावनिहाय आढावा घेऊन आवश्यक भागात दुष्काळसदृश परिस्थितीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार लोणीकर यांनी केली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments