Thursday, August 27, 2026
Homeऔरंगाबादवाघाडीच्या मुलींसाठी मानव विकास बससेवा सुरू; आमदार बबनराव लोणीकरांच्या प्रयत्नांना यश

वाघाडीच्या मुलींसाठी मानव विकास बससेवा सुरू; आमदार बबनराव लोणीकरांच्या प्रयत्नांना यश

वाघाडीच्या मुलींसाठी मानव विकास बससेवा सुरू; आमदार बबनराव लोणीकरांच्या प्रयत्नांना यश

 

स्वातंत्र्यानंतर प्रथमच वाघाडी गावातील मुलींसाठी नियमित बससेवा; ग्रामस्थांनी केले बसचे उत्स्फूर्त स्वागत
परतुर/प्रतिनिधी/ परतूर तालुक्यातील वाघाडी गावातील विद्यार्थिनींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या प्रवासाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्वातंत्र्यानंतर गावातील मुलींसाठी स्वतंत्र बससेवा उपलब्ध नसल्याने शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून वाघाडी येथील मुलींसाठी मानव विकास योजनेअंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे.
       बससेवा सुरू झाल्यानंतर वाघाडी ग्रामस्थांनी बसचे भव्य व उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचेही स्वागत करून त्यांना बसमधून शाळेत रवाना केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मुलींच्या सुरक्षित व सुलभ प्रवासाची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
      वाघाडी गावातील मुलींना शिक्षणासाठी बाहेरच्या गावात जावे लागते. मात्र, नियमित बससेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होण्याची शक्यता होती. अनेक विद्यार्थिनींना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. आर्थिकदृष्ट्या हा खर्च पालकांवर अतिरिक्त भार टाकणारा होता. त्यामुळे गावातील मुलींसाठी मानव विकास बस सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.
       या मागणीसाठी भाऊसाहेब दादा टेहळे, नाथा अर्जुन, रामकिसन तात्या टेहळे, भीमराव बाबासाहेब टेहळे, लक्ष्मण माने, गोविंद टेहळे, अंकुश शंभूदेव टेहळे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. त्यांनी विद्यार्थिनींच्या अडचणी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देत बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
आमदार बबनराव लोणीकर यांनीही या मागणीची दखल घेत विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा आणि सुरक्षित प्रवासाचा विचार करून मानव विकास बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर वाघाडी गावातील मुलींसाठी बससेवा उपलब्ध झाली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments