आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या पाठपुराव्याला यश
जालना महानगरपालिकेत आकृतीबंधानुसार 993 जागा भरतीला प्रत्यक्षात मान्यता
जालना/प्रतिनिधी/ जालना शहर महानगरपालिकेतील विविध विभागांमधील 993 जागा प्रत्यक्ष भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश प्राप्त झाले असून यामुळे पालिकेचा कारभार सुरळीत होणार आहे. यामुळे नागरिकांची विविध विकास कामे मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.
जालना शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाखावर पोचली आहे. त्यामुळे जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर व्हावे यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आग्रह धरला होता. त्यामुळे 22 ऑगस्ट 2023 रोजीच जालना शहर महानगरपालिका अस्तित्वात आली. महानगरपालिका अस्तित्वात येण्याआधी आणि नंतरही आमदार खोतकर यांच्या विरोधकांनी महानगरपालिकेस विरोध केला होता. नागरिकांना जास्तीचा टॅक्स द्यावा लागेल, मनपा कर्मचाऱ्यांचे पगार देखील होणार नाहीत, विकासकामाला खिळ बसेल अशा प्रकारची टीकाटिप्पणी त्यांच्या विरोधकांनी केली होती. परंतु प्रत्यक्षात जालना शहर महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शहराला मिळणाऱ्या विकासनिधीत वाढ झाली. महापालिकेला आयएएस दर्जाचे आयुक्त मिळाले. तसेच विविध विभागांसाठी 993 कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधास 19 सप्टेंबर 2025 रोजीच मान्यता मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात त्या त्या पदांची भरती व्हावी यासाठी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडे सातत्याने आग्रह धरला आणि पाठपुरावा केला. त्यामुळे आता थेट पदभरतीसही मान्यता मिळाली आहे. 19 ऑगस्ट रोजी तसा शासन निर्णय सहसचिव विद्या रामप्पा हंप्पया यांनी निर्गमित केला असून ( जालना शहर महानगरपालिका सेवा नियम 2026 ला मान्यता) लवकरच विविध पदांची नियमानुसार भरती होऊन महानगरपालिकेचा कारभार सुरळीत होईल व नागरिकांची विकास कामे होण्यास मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. शासनाने महानगरपालिकेतील विविध पदे भरण्यास प्रत्यक्षात मंजुरी दिल्याने आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहे. दरम्यान, जालना शहर आणि ग्रामीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही देखील आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली.