कत्तलीविरोधात आंदोलन, पण प्लास्टिक खाऊन मरणाऱ्या गायींकडे मात्र दुर्लक्ष!
कालीकुर्ती परिसरातील शहरी कचरा डेपोमुळे गोवंशाचा जीव धोक्यात, महापालिकेचे आश्वासन हवेत
जालना :- शहरात गोहत्येच्या विरोधात रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करणारे गोरक्षक प्रत्यक्षात गायींच्या मृत्यूमागील खऱ्या आणि रोजच्या कारणाकडे मात्र सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचे चित्र जालना शहरात पाहायला मिळत आहे. शहरातील गायींसाठी प्रसिद्ध असलेल्या कालीकुर्ती परिसरातच शहराचा कचरा डेपो थाटलेला असून, याच डेपोत मोठ्या प्रमाणावर गायी प्लास्टिक कचरा खाऊन आजारी पडत असल्याचे व त्यातून त्यांचा मृत्यू होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र गोरक्षकांचे आंदोलन केवळ कत्तलखान्यांभोवती केंद्रित असून, शहरातील अस्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे मात्र कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
कालीकुर्ती परिसर हा जालना शहरात गोपालनासाठी विशेष ओळखला जातो. या भागात मोठ्या संख्येने गोवंश मुक्तपणे फिरत असतो. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे याच परिसरात शहरातील कचरा टाकण्यासाठी डेपो उभारण्यात आलेला आहे. या डेपोत रोज टनावारी कचरा टाकला जातो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आणि इतर टाकाऊ पदार्थांचा समावेश असतो. भुकेल्या गायी या कचऱ्यातील प्लास्टिक खाद्यपदार्थ समजून खातात आणि हळूहळू त्यांच्या पोटात प्लास्टिकचा साठा वाढत जातो. परिणामी गायी गंभीर आजारी पडतात आणि अनेकदा उपचारादरम्यान किंवा उपचाराअभावी त्यांचा मृत्यू होतो.
विशेष म्हणजे जालना महानगरपालिकेने काही काळापूर्वी हा कचरा डेपो शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. डेपो अजूनही शहराच्या मध्यवर्ती भागातच कार्यरत असून, नागरिक आणि गोवंश दोघांच्याही आरोग्यास याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहिला आहे.
या संदर्भात बोलताना ॲड. महेश धनावत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “गोहत्येच्या विरोधात आवाज उठवणे हे निश्चितच योग्य आहे, परंतु ज्या गायी आपल्या डोळ्यांसमोर रोज प्लास्टिक खाऊन तडफडून मरत आहेत, त्यांच्याविषयी मात्र कोणीही बोलायला तयार नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. खऱ्या गोरक्षणाची सुरुवात स्वच्छतेपासून व्हायला हवी. कालीकुर्ती परिसरातील कचरा डेपो तात्काळ हटवला गेला पाहिजे. गोरक्षकांनी आता आपला मोर्चा कत्तलखान्यांसोबतच महापालिकेच्या दिशेनेही वळवायला हवा आणि प्रशासनाला जाब विचारायला हवा. अन्यथा हे तथाकथित गोरक्षण केवळ दिखाव्यापुरते राहील.”
गोरक्षणाच्या नावाखाली होणारे आंदोलन आणि प्रत्यक्षातील गोवंशाची होणारी परवड यामधील ही तफावत आता शहरातील जागरूक नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. कालीकुर्ती परिसरातील कचरा डेपो तातडीने हटवून शहरात ठोस कचरा व्यवस्थापन प्रणाली राबवावी आणि गोवंशाच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा गोरक्षणाच्या घोषणा केवळ कागदावरच राहतील आणि प्लास्टिक खाऊन गायींचा जीव जाण्याचे सत्र असेच सुरू राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
