Thursday, August 6, 2026
Homeऔरंगाबादजायकवाडीतून गोदावरीत जलविसर्ग; नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जायकवाडीतून गोदावरीत जलविसर्ग; नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जायकवाडीतून गोदावरीत जलविसर्ग; नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

घनसावंगी/प्रतिनिधी/ मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन, कापूस, मका, तूर, भाजीपाला तसेच ऊस पिकांवर पाण्याअभावी ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत पैठण येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातील पाणीसाठा वाढल्याने गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलविसर्ग सुरू करण्यात आला असून, त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुरुवार (६ ऑगस्ट) रोजी सकाळी ९ वाजेच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण ९२.९० टक्के भरले असून धरणाची पाणीपातळी १,५२०.७० फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणात सध्या १३ हजार १६३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी गोदावरी नदीपात्रात १९ हजार २६ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय सिंचनासाठी डाव्या कालव्यातून ७०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून १,००० क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे.
     दीर्घकाळ कोरडे पडलेले गोदावरीचे पात्र आता पुन्हा प्रवाहित झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी नदीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत असून नागरिकांनी नदीकाठी जाऊन वाहत्या पाण्याचे स्वागत केले. गोदावरी ही मराठवाड्याची जीवनवाहिनी मानली जात असल्याने या जलविसर्गाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले होते.
     यंदा पावसाच्या मोठ्या खंडामुळे नदी-नाले, ओढे कोरडे पडले असून विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. परिणामी खरीप पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला असून अनेक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. गोदावरीत पाणी आल्यामुळे नदीलगतच्या विहिरी, कूपनलिका, बंधारे आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा थेट फायदा नदीकाठच्या शेतकऱ्यांना होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
      दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांत मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविली असली तरी जायकवाडीतून सुरू झालेला जलविसर्ग हा सध्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. प्रशासनाने नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिक, शेतकरी व मच्छीमारांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, विनाकारण नदीपात्रात उतरू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments