Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादजंक फूडवर बंदी : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल

जंक फूडवर बंदी : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल

जंक फूडवर बंदी : विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल

           महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शाळांच्या आजूबाजूला फास्ट फूड, शीतपेये, चिप्स, चॉकलेट, पॅकेज्ड स्नॅक्स आणि इतर आरोग्यास अपायकारक पदार्थांची सहज उपलब्धता विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरत होती. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अत्यंत स्वागतार्ह आहे.
     आजच्या बदलत्या जीवनशैलीत मुलांचा कल घरगुती पौष्टिक आहारापेक्षा पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, नूडल्स, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स यांसारख्या पदार्थांकडे अधिक वाढला आहे. या पदार्थांमध्ये साखर, मीठ, तेल आणि कृत्रिम रंगांचे प्रमाण जास्त असल्याने लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, दातांचे विकार, पचनाचे आजार आणि इतर अनेक आरोग्य समस्या बालवयातच निर्माण होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील बालकांमध्ये वाढणाऱ्या लठ्ठपणाबाबत वारंवार चिंता व्यक्त केली आहे.
      शाळा हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे शाळेच्या परिसरात आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराची सवय लागावी, यासाठी शाळांमधील कँटीनमध्ये सकस आणि संतुलित अन्न उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त जंक फूडवर बंदी घालून हा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही. त्यासाठी फळे, दूध, ताक, मोड आलेली कडधान्ये, ताजे फळांचे रस, पौष्टिक नाश्ता यांना प्रोत्साहन द्यावे लागेल.
       या आदेशानुसार शाळांची नियमित तपासणी केली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. हा निर्णय प्रभावी ठरण्यासाठी स्थानिक प्रशासन, शाळा व्यवस्थापन, पालक आणि विक्रेते यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा शाळेच्या गेटबाहेर हातगाड्यांवर किंवा छोट्या दुकानांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे पदार्थ विकले जातात. अशा विक्रेत्यांवरही प्रभावी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
       पालकांची भूमिकाही येथे अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक पालक मुलांच्या हट्टापायी रोज खाऊसाठी पैसे देतात. त्याऐवजी घरातून पौष्टिक डबा देणे, संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगणे आणि स्वतःही आरोग्यदायी जीवनशैलीचे उदाहरण ठेवणे आवश्यक आहे. मुलांमध्ये लहानपणापासून योग्य आहाराच्या सवयी रुजल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आयुष्यभर दिसून येतो.
        शाळांमध्ये पोषण शिक्षणावर भर देणे, संतुलित आहाराचे महत्त्व अभ्यासक्रमातून सांगणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम व मैदानी खेळांची आवड निर्माण करणेही तितकेच आवश्यक आहे. मोबाईल, टीव्ही आणि संगणकासमोर वाढणारा वेळ कमी करून शारीरिक हालचालींना प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांचे आरोग्य अधिक सक्षम होईल.
 मात्र, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी हेच खरे आव्हान आहे. अनेक वेळा नियम तयार होतात; परंतु त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने नियमित तपासणी, जनजागृती आणि दंडात्मक कारवाई यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. केवळ बंदी नव्हे, तर आरोग्यदायी पर्याय सहज उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
        विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. त्यांचे आरोग्य सुदृढ राहणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. जंक फूडवरील निर्बंध हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून निरोगी पिढी घडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शासनाचा हा निर्णय प्रभावीपणे राबविला गेला आणि पालक, शिक्षक व समाजाने त्याला सकारात्मक साथ दिली, तर भविष्यात अधिक निरोगी, सक्षम आणि जागरूक पिढी घडण्यास निश्चितच मदत होईल.
-श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments