Wednesday, August 5, 2026
Homeऔरंगाबादआरक्षण बचाव, उपवर्गीकरण हटावसाठी तेलगावात आक्रोश आंदोलन; सरकारला निर्णय मागे घेण्याचा इशारा...

आरक्षण बचाव, उपवर्गीकरण हटावसाठी तेलगावात आक्रोश आंदोलन; सरकारला निर्णय मागे घेण्याचा इशारा – विजयदादा साळवे

आरक्षण बचाव, उपवर्गीकरण हटावसाठी तेलगावात आक्रोश आंदोलन; सरकारला निर्णय मागे घेण्याचा इशारा – विजयदादा साळवे

माजलगाव/प्रतिनिधी/  अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने मंगळवारी तेलगाव येथे आक्रोश आंदोलन करण्यात आले. “आरक्षण बचाव, उपवर्गीकरण हटाव” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनात बोलताना रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा निमंत्रक विजयदादा साळवे म्हणाले, संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या आरक्षणाच्या अधिकारावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा आणि आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी रिपब्लिकन सेना शेवटपर्यंत संघर्ष करत राहील. समाजाचा फायदा-तोटा किंवा राजकीय स्वार्थ न पाहता मनुवादी विचारसरणीविरुद्ध लढणे ही आमची भूमिका असून ती कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, बदर आयोगाचा अहवाल जाहीर न करताच शासन हरकती मागवत आहे. अहवाल सार्वजनिक न करता हरकती मागविणे ही पारदर्शकतेच्या तत्त्वांना छेद देणारी बाब आहे. शासनाने प्रथम अहवाल जाहीर करून त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवावी. उपवर्गीकरणाचा परिणाम केवळ एका समाजावर नव्हे, तर सर्व अनुसूचित जातींवर होणार असून मातंग समाजालाही त्याचा फटका बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
मुंबई येथे रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य मोर्चानंतर आता राज्यभर गावोगावी आंदोलनाची लाट निर्माण झाली आहे. सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा जनआंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments