आ.विलास भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे राहुलनगरसह ईतर वस्त्यांच्या नियमानुकुल प्रक्रियेला आला वेग
पैठण :- कातपूर ग्रामपंचायत हद्दीतील राहूलनगर,संजयनगर, दाळवाडी दलित वस्ती, राजीवनगर आणि बाजारतळ या वस्त्या मागील अनेक वर्षांपासून नियमानुकुल करण्याच्या प्रतीक्षेत होत्या.या वस्त्या येथील नागरिकांच्या नावावर करण्याच्या प्रश्नाला शासन दरबारी अखेर गती मिळाली आहे.आ.विलास बापू भुमरे यांच्या प्रयत्नामुळे शासन स्तरावर या प्रस्तावाची प्रक्रिया पुढे सरकुन लवकरच या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होणार असल्याने येथील स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या वस्त्यां नियमानुकुल करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सबंधित ग्रामपंचायत,जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त कार्यालय तसेच मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला व करत आहेत.पैठणचे आ.विलास भुमरे यांनीही कष्टकरी,कामगार,मागासवर्गीय नागरिकांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत महसूल मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून या वस्त्या नियमानुकुल करण्याचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याची मागणी लावून धरली.त्यांच्या पाठपुराव्याला यश येवून या वस्त्या नावावर करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून सरपंच सविता मोरे,उपसरपंच माया खडसन,भाऊसाहेब खुटेकर,एस.डी.जाधव,दशरथ भाई आडसुळ लक्ष्मणराव सुर्यनारायण,विजय खडसन, किरण सुर्यनारायण, गंगाधर म्हस्के,राजू सोनवणे आणि आशिषकुमार जाधव, अव्वल अविनाश मिसाळ यांनी सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या मागण्यांना शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले.त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आवश्यक कागदपत्रे आणि मागण्यांचा पाठपुरावा केल्यामुळे प्रक्रियेला गती मिळाली आहे.या वस्त्या नियमानुकुल झाल्यास येथील नागरिकांना बांधकाम परवानगी, घरकुल, पाणी, वीज, रस्ते तसेच विविध शासकीय कर्ज योजनांचा लाभ मिळणे अधिक सुलभ होणार आहे.त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.