Wednesday, July 1, 2026
Homeऔरंगाबादजुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ; महाकर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ; महाकर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ; महाकर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात

 

छत्रपती संभाजीनगर :- राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असून, योजनेची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लाखो शेतकरी कुटुंबांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (ओटीएस) योजना, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

योजनेची संपूर्ण प्रक्रिया आधार क्रमांकावर आधारित व ऑनलाइन ठेवण्यात आली असून, महाआयटीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची संगणकीय पडताळणी केली जात आहे. अंतिम याद्या ग्रामपंचायत, बँका, आपले सरकार सेवा केंद्र तसेच गाव चावडीवर प्रसिद्ध करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना मोबाईल संदेशाद्वारेही माहिती दिली जाणार आहे.

पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ओटीएस योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम स्वतःचा हिस्सा जमा केल्यानंतरच शासनाकडून कर्जमुक्तीची रक्कम त्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाणार आहे. तसेच तांत्रिक अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जपात्र होऊन नवीन पीक कर्ज मिळविण्याचा मार्ग मोकळा होणार असून, राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळण्याबरोबरच बळीराजाला आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments