ऑपरेशन यात्री सुरक्षा व ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफ
नांदेडची उल्लेखनीय कामगिरी
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षा, संरक्षा आणि सहाय्यासाठी रेल्वे सुरक्षा बल (RPF), नांदेड विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा आणि ऑपरेशन अमानत अंतर्गत चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे, आरोपींना अटक करणे तसेच हरवलेल्या मालमत्तेची यशस्वीपणे पुनर्प्राप्ती करण्यात उल्लेखनीय यश मिळाले आहे.
चोरीचा गुन्हा उघडकीस; ₹७० हजार किमतीचे दागिने जप्त.
ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफ गुन्हे गुप्तवार्ता शाखा व गुप्तहेर विभाग (CIB-D&I), नांदेड तसेच शासकीय रेल्वे पोलीस (GRP), नांदेड यांच्या संयुक्त पथकाने भारतीय न्याय संहिता कलम ३०५(सी) अंतर्गत नोंद असलेला गुन्हा क्रमांक ३८७/२०२६ यशस्वीरीत्या उघडकीस आणला.
सदर प्रकरणात गाडी क्रमांक १२४४० श्रीगंगानगर–हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेसच्या बी-१ डब्यातून सुमारे ₹७०,००० किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असलेली ट्रॉली बॅग चोरीस गेली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संयुक्त पथकाने राजस्थान येथील रहिवासी आकाशदीप सिंग (वय २५ वर्षे) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने दिनांक १३ जून २०२६ रोजी गाडी पूर्णा रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता मा. जेएमएफसी न्यायालय, नांदेड यांनी पोलीस कोठडी मंजूर केली. पुढील तपासादरम्यान चोरीस गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले.
दोन चैन स्नॅचर अटकेत; ₹४.५० लाखांची सोन्याची चैन हस्तगत
ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आणखी एका यशस्वी कारवाईत परतूर रेल्वे स्थानकावरील सतर्क आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दोन संशयित चैन स्नॅचरना ताब्यात घेतले.
गाडी क्रमांक १७६१९ छत्रपती संभाजीनगर–हजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस स्थानकातून सुटत असताना हे दोघे धावत्या गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करताना आढळले. तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान काकासाहेब पळसकर आणि सागर काकडे, दोघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी, यांनी एका महिला प्रवाशाची सोन्याची चैन हिसकावून पळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आरोपींकडून अंदाजे ३० ग्रॅम वजनाची व सुमारे ₹४.५० लाख किमतीची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली. यानंतर या घटनेबाबत रेलमदत तक्रार प्राप्त झाली.
तक्रारदार श्रीमती शुभांगी भवानी (वय ३१ वर्षे), निजामाबाद, तेलंगणा यांनी हस्तगत करण्यात आलेली चैन स्वतःची असल्याचे ओळख पटवून दिली. त्यानंतर आरोपी व जप्त माल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी परतूर यांच्या ताब्यात देण्यात आला.
ऑपरेशन अमानत अंतर्गत हरवलेली बॅग प्रवाशास परत
ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफ कर्मचाऱ्यांनी एका प्रवाशाची गाडीत राहिलेली बॅग शोधून सुरक्षितपणे परत केली.
गाडी क्रमांक १२७५२ हमसफर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने अकोला रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर बी-५ डब्यात काळ्या रंगाची बॅग राहिल्याबाबत रेलमदत तक्रार नोंदविली होती.
माहिती मिळताच वाशीम येथे आरपीएफ कर्मचाऱ्यांनी संबंधित गाडीची तपासणी करून निर्दिष्ट बर्थवरून बॅग हस्तगत केली. बॅगेमध्ये छायाचित्रण साहित्य (Photography Equipment) व इतर वस्तू मिळून अंदाजे ₹८,५०० किमतीचा माल होता.
आरक्षण नोंदींच्या आधारे मालकाची ओळख पडताळून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सदर बॅग प्रवाशाच्या अधिकृत नातेवाईकाकडे सुपूर्द करण्यात आली. बॅगेतील सर्व साहित्य सुरक्षित व सुस्थितीत असल्याचे आढळून आले.
चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे, चोरीस गेलेली मालमत्ता परत मिळवणे, आरोपींना अटक करणे तसेच प्रवाशांना तत्पर मदत पुरविणे या माध्यमातून आरपीएफ नांदेड विभागाने सुरक्षित, संरक्षित आणि प्रवासी-अनुकूल रेल्वे वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
