Saturday, June 20, 2026
Homeऔरंगाबादपाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनाचा भारताने फायदा घ्यावा

पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनाचा भारताने फायदा घ्यावा

पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनाचा भारताने फायदा घ्यावा

           भारताचे तुकडे करून काश्मीरला स्वतंत्र राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानचेच आणखी तुकडे होण्याची वेळ आली आहे असे म्हणावे लागेल कारण पाकिस्तानमधील बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील नागरिक पाकिस्तानच्या दडपलशाहीला कंटाळून  पाकिस्तानमधून स्वतंत्र होण्यासाठी झटत असताना आता पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकही पाकिस्तानच्या दडपशाहीविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करून पाकिस्तानातून अलग होऊन भारतात सामील होण्यासाठी आंदोलन करत आहेत. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्यासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी पाकिस्तानशी सशस्त्र लढा देत आहे. पाकिस्तान आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांच्यात सतत लढाई सुरू असते.   सिंध प्रांतातील नागरिकही पाकिस्तानच्या दडपशाहीला कंटाळून रस्त्यावर उतरून पाकिस्तान सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत स्वतंत्र सिंध राष्ट्राची मागणी करत  असतात. आता पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक तर थेट आम्ही भारतात सामील होऊ इच्छितो म्हणत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मागील काही काळापासून पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पाकिस्तान सरकारच्या दडपशाहीचा सामना करत आहेत. पाकिस्तान सरकार पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांकडे दुर्लक्ष करत असून येथील नागरिकांना पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देत नाही. पाकिस्तानमधील सरकार पाकव्याप्त काश्मीरमधील साधनसंपत्तीचे शोषण करत असून नागरिकांना कोणत्याही सुविधा देत नाही त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये पाक सरकार विरुद्ध प्रचंड असंतोष होता त्यात पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्मिती केल्या जाणाऱ्या  विजेचे प्रचंड बिल पाकिस्तान सरकार इथल्याच नारिकांकडून वसूल करत असल्याने पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पाक सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जॉइंट अवामी ऍक्शन कमिटी ( जे ए ए सी ) ही संघटना करत आहे.  पाकिस्तान या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणत असली तरी या संघटनेत डॉक्टर, इंजिनिअर , वकील यासारखे उच्चशिक्षित लोक आहेत.  ही संघटना आपल्या न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या नंतर घाबरलेल्या पाकिस्तान सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी केलेल्या गोळीबारात २० हून अधिक आंदोलकांचा बळी गेला आहे. अर्थात ही आकडेवारी पाकिस्तान सरकारची आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक लोकांचा बळी गेला असल्याची शक्यता पत्रकारांनी व्यक्त केली असून या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. ब्रिटनमधील ५० संसद सदस्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिवर चिंता व्यक्त केली असून युरोपातील काही शहरात पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात निदर्शने करण्यात आली आहे. भारतानेही पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या गोळीबाराला मानवी संहार असे म्हटले असून यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला जबाबदार धरावे अशी मागणी केली आहे. पाकिस्तानने मात्र नेहमीप्रमाणे या आंदोलनाला भारताची फूस असल्याचे म्हणत या आंदोलनासाठी भारताला जबाबदार धरले आहे. हे आंदोलन करणारी जे ए ए सी ही संघटना गद्दार असून या संघटनेला भारताकडून आर्थिक पाठबळ पुरवले जात असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे अर्थात भारताने हा आरोप फेटाळला असून पाकिस्तानमधील नागरिक सरकार विरुद्ध रस्त्यावर का उतरत आहेत याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला पाकिस्तान सरकारला भारताने दिला आहे. बलुचिस्तान, सिंध प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीर मधील साधन संपत्तीचा पाकने वापर करून घेतला पण तेथील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीत. तेथील नागरिकांवर सतत अन्याय अत्याचार केला. तेथील नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नागरिकांवर बळाचा वापर करून  दडपशाही  केली. तेथील नागरिकांचे जगणे मुश्किल केले.  महागाई प्रचंड वाढवली. तेथील नागरिकांना एकवेळेचे पुरेसे अन्न मिळणे देखील मुश्किल झाले म्हणूनच पाकव्याप्त काश्मीरमधील या आंदोलनात आम्हाला एकवेळेचे अन्न देखील मिळत नाही. अन्नासाठी आम्ही भारतातही जाऊ शकतो असे दावे काही आंदोलकांनी केले. काही आंदोलकांनी तर थेट भारतात सामील होण्याची मागणी केली. अर्थात भारताने या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र आज ना उद्या भारताला यावर बोलावेच लागेल. वास्तविक भारतासाठी ही सुवर्णसंधी आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांच्या या असंतोषाचा फायदा घेऊन भारताने पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानधून मुक्त करून भारताला जोडण्यासाठी प्रयत्न करावा अर्थात हे वाटते तितके  सोपे नाही हे जरी मान्य केले तरी  तरी यानिमित्ताने  चालून आलेली ही संधी भारताने साधायला हवी हे ही तितकेच खरे आहे.
-श्याम ठाणेदार
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments