कधी बदलणार समाजाची मानसिकता?
पुणे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन महिलांचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपींसह काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या गर्भलिंग निदान रॅकेटची कसून चौकशी पोलिस करत आहेत. एक डॉक्टर बेकायदेशीर गर्भलिंग निदान करत असल्याचा व्हिडिओ देखील समाज माध्यमात व्हायरल झाला असून या रॅकेटची व्याप्ती खूप मोठी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून या बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीने ५०० हून अधिक स्त्रीभ्रूण हत्या केल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बेकायदेशीर गर्भलिंग निदान रॅकेटचा भांडाफोड झाल्याने सर्वत्र खळबळ माजली असून स्त्री भ्रूण हत्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्या करणे कायद्याने गुन्हा असतानाही असे प्रकार सातत्याने घडताना दिसतात. अर्थात याला समाजाची मानसिकता कारणीभूत आहे आज २१ व्या शतकातही आपल्या समाजाची मानसिकता १८ व्या शतकातील आहे हेच यावरून सिद्ध झाले आहे. स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांवरून सिद्ध होते की आजही आपण मुलींकडे सकारात्मक दृष्टीने पाहत नाही. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही मुलींकडे नकारात्मक दृष्टीनेच पाहिले जाते. मुलगी म्हणजे परक्याचे धन ही अठराव्या शतकातील मानसिकता आजही कायम आहे. मुलगी ही परक्याचे धन असल्याने तिला जन्म घेण्याचा अधिकारच नाही अशी पुरुषी मानसिकता आजही समाजातील काही लोकांत आहे जरी मुलगी जन्माला आली तरी तिला प्रत्येक पातळीवर मानहानी स्वीकारावी लागते. मुलांना हारतुरे देऊन त्यांचा लाड करणारा आपला समाज मुलींचा गळा घोटायला देखील मागेपुढे पाहत नाही. मुलांना वंशाचा दिवा म्हणतात पण मुलगी देखील वंशाची पणती आहे हे विसरून तिला विजवले जाते. एकाच समाजाचे हे दोन भिन्न टोक विदारक चित्र दर्शवते. मुलींबद्दल आपल्या समाजात कमालीची असहिष्णुता दिसते. कधी मुलींना गर्भातच मारून टाकले जाते तर कधी जन्मल्यानंतर कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिले जाते. एकीकडे दुर्गा, लक्ष्मी या देवींची पूजा करायची तर दुसरीकडे त्यांचेच दुसरे रूप असलेल्या मुलींचा मात्र दुस्वास करायचा. ज्या देशात राष्ट्रपती, पंतप्रधान असे देशाचे सर्वोच्चपद महिलेने सांभाळले आहे त्याच देशात मुलींना जन्म घेण्याचा देखील अधिकार नाही याला काय म्हणावे ? आजही भारतीय समजात मुलगा, मुलगी असा भेद केला जातो म्हणूनच लिंग परीक्षण, स्त्रीभ्रूण हत्या या सारखे प्रकार या देशात घडतात. आपल्या देशात लिंग परीक्षण, भ्रूण हत्येला बंदी असतानाही कधी कायद्याच्या पळवाटा शोधून तर कधी कायद्याचे रक्षक असलेल्या शासन आणि प्रशासनाचे हात ओले करून लिंग परीक्षण व स्त्री भ्रूण हत्या केली जाते म्हणूनच आपल्या देशात मुलांच्या मानाने मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे. काही वर्षापूर्वी युनायटेड स्टेट ऑफ पॉप्युलेशन फंड ( यूएनपीएफ) या लोकसंख्या विषयी अभ्यास करणाऱ्या जागतिक संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालानुसार हा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच्या चार वर्षात भारतातल्या ४ लाख ६० हजार मुलींचा जन्माआधीच गळा घोटण्यात आला होता. त्यात गर्भलिंग परीक्षणात दोन तृतीयांश तर प्रसूती पश्चात मुलगी झाल्याचे कळल्याने एक तृतीयांश मुली नाहीशा झाल्या होत्या. भारतासारख्या पुरोगामी देशाला खाली मान घालायला लावणारा हा अहवाल होता. २१ व्या शतकातही आपल्या समाजाची मानसिकता १८ व्या शतकातीलच आहे हे दाखवणारा हा अहवाल होता. हा अहवाल सरकारच्या देखील डोळ्यात अंजन घालणारा होता. या अहवालानंतर सरकार गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्ये विरोधात कठोर भूमिका घेईल आणि दोषींना कठोरातील कठोर कारवाई करेल जेणे करून या घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा होती पण ती अपेक्षा फोल ठरली असेच पुण्यातील या घटनेने म्हणावे लागेल. केवळ बेटी बचाओ, बेटी पढाओ अशी नारेबाजी करून मुली वाचणार नाहीत तर त्यासाठी सरकारने ठोस धोरण आखायला हवे. लिंग परीक्षण, स्त्री भ्रूण हत्ये विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करायला हवी. दोषींना कठोर शिक्षा करायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजाची मानसिकता बदलायला हवी त्यासाठी समाजाचे सातत्याने प्रबोधन व समुपदेशन करायला हवे.
श्याम ठाणेदार