चायनिज पदार्थ आरोग्यासाठी हानिकारकच
भारतीयांना चायनीज गोष्टीचे पूर्वीपासूनच आकर्षण आहे. अगदी चिनी वस्तूंपासून चायनिज पदार्थांपर्यंत सर्वच गोष्टी भारतीयांना आवडतात. त्यातही चायनिज पदार्थांची तर सर्वांना चटक लागलेली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले तर बरेच जण चायनिज पदार्थांचाच बेत करतात. मात्र भारतात आणि चीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थात खूप फरक आहे. भारतात चायनिज पदार्थांच्या नावाखाली जिभेला पूरक ठरतील असे चवीचे पदार्थ तयार केले जातात. रस्त्याशेजारी, फुटपाथवर, गल्लीबोळात स्वस्त आणि सहज मिळणारे गडावरील चायनिज पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल असते त्यातही या गाड्यांवर तरुणाईच अधिक दिसते. चायनिज गाड्यांवर तरुणाईची झुंबड उडाल्याचे दिसते. ग्रुपमधील कोणा मित्राचा वाढदिवस असेल तर तो साजरा करण्यासाठी तरुणाई चायनिज गाड्यावरच जातात. हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या तुलनेत येथे स्वस्तात पदार्थ मिळतात हे त्या मागचे मुख्य कारण आहे. मात्र हे पदार्थ स्वस्तात देण्यासाठी तेथील आचारयाना अनेक तडजोडी कराव्या लागतात. त्यात निकृष्ट प्रकारच्या पदार्थांच्या भाज्या आणि तेल वापरले जाते. चायनिज पदार्थांमध्ये अजिनिमोटो हा पदार्थ वापरला जातो. पदार्थांना चव आणण्यासाठी या पदार्थांचा वापर केला जातो. आवश्यकतेपेक्षा जास्त अजिनिमोटो हा पदार्थ वापरला गेला तर त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊ शकतो. चायनिज पदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यासारखे जिन्नस वापरल्यामुळे पचन संस्था बिघडू शकते. भात बांबूचे मूळ, मशरूम, नूडल्स, चिकन, मांस अर्धवट शिजवले जातात त्यामुळे ते पचायला जड जातात चांगल्या प्रतीचा मैदा नसल्यास तो आतड्यास चिकटू शकतो. चायनिज पदार्थांमध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश आणि रिफाईंड असल्याने पचन संस्थेसाठी हितकारक नसतो. त्यामुळे चायनिज पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारकच आहे. एखाद्यावेळी चायनिज पदार्थ खाल्ल्याने ते ही चांगल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जाऊन तर बिघडत नाही. पण आठवड्यातून चार पाच वेळा चायनिज पदार्थ खाण्याची सवय हानिकारक ठरू शकते.
-श्याम ठाणेदार