धर्माच्या नावानं कुणीही रक्त सांडवू नये?
धर्म……. आज सर्वच लोकं मी अमुक धर्माचा, तो अमूक धर्माचा. असं म्हणून समाजात धार्मिक तेढ निर्माण करतात. त्याच आधारावर भांडतात. एकमेकांची कत्तल करतात. पर्यायानं सांगायचं झाल्यास धर्माच्या नावावर अशी मंडळी आपल्याच भावा बहिणींचं रक्त सांडवतात. जे इतिहासात घडलेलं दिसलं. इतिहासात धर्माच्या नावावर अनेक युद्ध झालीत. काहींच्या माना कापल्या गेल्यात. अनन्वीत हाल हाल झालेत आणि ज्यांनी ज्यांनी हाल केलेत. ती मंडळी हेही विसरली होती की मी याच देशाचा रहिवाशी असून माझा धर्म नेमका कोणता होता? कोणता असू शकतो? अन् माझ्या शरीरात कोणाचे रक्त असू शकते? महत्वपुर्ण बाब ही की जर धर्माचा हाच इतिहास लक्षात घेतल्यास आता या देशात राहणारे सर्व वेगवेगळ्या धर्माचे लोक हे एकाच आईची लेकरं असून ते आजही एकाच धर्माचे आहेत. आज जरी ते वेगवेगळ्या धर्माचे असले तरी. मग मी अमुक धर्माचा व मी तमुक धर्माचा. अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये का यावेत? का येवू द्यावेत आपण? ही विचारात घेण्यालायक वस्तूस्थिती आहे. याचा सर्वांनी विचार करावा यात शंका नाही.
धर्म…… धर्म कोणताही का असेना, धर्माबाबत लोकं आगपाखड करीत असतात. ही आगपाखड असते, आपल्या धर्माला श्रेष्ठ समजण्यासाठी. परंतु तसं श्रेष्ठ समजत असतांना हाताची चार बोटं आपल्याकडे असतात. ही गोष्ट विसरली जाते.
धर्माबाबत सांगायचं झाल्यास काही धर्म असेही आहेत की त्या धर्माला आजची मंडळी ही नेहमीच दुषणं लावत असतात. त्या धर्माला काहीबाही बोलत असतात आणि त्याही धर्मातील लोकं न चिडता, न रागवता आपल्याच धर्माला काहीबाही म्हणणाऱ्या लोकांचे वाईट बोल न रागवता ऐकत असतात. कारण त्यांच्यात सहनशिलता ही कुटकूट भरलेली असते. परंतु काही धर्म असेही आहेत की त्या धर्माबाबत साधा ब्र देखील उल्लेखला गेला तर दंगे होतात. ज्याला धार्मिक दंगे असंही नाव आहे.
आज धर्माच्याच नावानं दंगे उसळत आहेत. मुख्य म्हणजे देशातील लोकं इतरांच्या धर्माला तुच्छ लेखून त्याच्यावर आगपाखड करणारे आहेत व असे केल्यानं त्यांना जो असूरी आनंद प्राप्त होतो. तो आनंद त्यांच्यासाठी उल्लेखनीय असतो.
धर्मवाढ……. धर्मवाढीबाबत सांगायचं झाल्यास प्राचीन काळात आपलाच धर्म श्रेष्ठ मानून धर्मवाढीच्या दृष्टीनं प्रयत्न झालेत. ज्यातून कत्तली झाल्या. युद्ध झालीत. तसा प्राचीन काळाचा इतिहास पाहिल्यास प्राचीन काळात पहिलं धार्मिक युद्ध मुख्यतः येथील द्रविड अर्थात आदिवासी आणि आर्य यांच्यात झालं. ज्यात द्रविडांचा कोणताच धर्म नव्हता व धर्म म्हणजे काय असतं? तेही त्यांना माहीत नव्हतं. पुढं त्यांच्यात जे युद्ध झालं. ज्यात आर्य विजयी झाले व त्यांनी आपला वैदिक धर्म प्रसारीत केला. त्यातच त्यांना धर्म म्हणजे काय? हेही समजावून सांगीतलं. त्यांनीच देव दगडात असतो. प्राणीमात्रात असतो. हेही समजावून सांगीतलं. अन् हा वैदिक धर्म येथील अस्तित्वात असलेल्या द्रविड अर्थात आदिवासींनीही पसंत केला, स्विकारला. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी धार्मिक अतिक्रमण गौतम बुद्धाच्या काळात झालं. ज्यात गौतम बुद्धांनी जेव्हा आपला बुद्ध धम्म सांगीतला. तेव्हा ज्या कोणत्या वैदिक धर्मातील लोकांना बुद्ध धम्म सांगीतला. ती मंडळी बौद्धधर्मीय झाली. तसंच त्याच काळात अस्तित्वात आलेला जैन धर्म. त्याही धर्मांनी वैदिक धर्मावरच अतिक्रमण केलं व आपला धर्म वाढवला. ज्यात मुळचेच द्रविड असलेले व आता धर्मपरीवर्तनानं वैदिक झालेली मंडळी नव्या धर्माच्या तत्वानं आकर्षीत झाली व ती पुढं बौद्ध व जैन बनली. आता देशात तीन धर्म अस्तित्वात आले होते. पहिला वैदिक की जो येथील तमाम द्रविड अर्थात आदिवासींनी स्विकारला होता. दुसरा धर्म बुद्ध की ज्यात मुळचे द्रविड असलेले व आता वैदिक बनलेले लोकं होते. जे आता बौद्ध बनले होते. तसाच तिसरा धर्म जैन की ज्यातही मूळचेच द्रविड असलेले व आता वैदिक बनलेले लोकं होते. तेही नव्याने जैन बनले होते. तसेच जे जैन आणि बौद्ध बनले होते. त्यांच्यात द्रविडांचंच रक्त होतं. जे द्रविड मूळातच सहनशील होते.
जैन आणि बुद्ध धम्म. या दोन धर्माचा जन्म हा भारतातील आहे. सध्या भारतात अनेक धर्म आहेत. वैदिक धर्मही आर्यांनीच आणलेला असून जर आर्यांना परकीय मानल्यास तोही धर्म बाहेरीलच. तसा बौद्ध व जैन धर्म येथील असंतुष्ट असलेल्याच घटकांनी स्विकारला असेल त्या काळात. ज्यात द्रविड अर्थात आदिवासीही असू शकतात आणि मुळातील आर्य अर्थात वैदिक धर्माचे लोकंही असू शकतात की जे इतर देशातून आले. परंतु ते इथंच बऱ्याच वर्षांपासून राहात असल्यानं भारतीयच झाले. पुढं भारतात तीन धर्म अस्तित्वात आल्यानंतर त्या तीनही धर्मांना राजाश्रय प्राप्त झाला. येथूनच निर्माण झाला खरा संघर्ष. धर्माबाबत आगपाखड आणि आपला धर्म वाढविण्यासाठी केलेला सत्तासंघर्ष. ज्यात राग येवून एकमेकांच्या धर्मातील लोकांना कापणं. त्यांची बेवारस विनाकारण हत्या करणं. हे चालत राहिलं, अरब भारतात येईपर्यंत. तसं पाहिल्यास प्रत्येक राज्यांनी एकमेकांना जिंकल्यावर आपली राजेशाही निर्माण केली व या भारतात आपलाच धर्म टिकून राहावा म्हणून स्थापत्य कलेला भरपूर वाव दिला. अनेक बांधकामं केली. त्यानंतर उजळला अर्वाचीन काळ. त्या काळाचा इतिहास आपल्याला माहीत असेलच. अर्वाचीन काळात मुस्लिम आणि त्याकाळचे देशातील सर्व धर्मीय अर्थात बौद्ध, जैन व वैदिक लोकांचे युद्ध झाले. आपला अरबी धर्म वाढवीत असतांना अल्लाउद्दीन खिलजींनी नालंदा व तक्षशिला ही दोन्ही विद्यापीठं नष्ट केलीत असं म्हटलं जातं व मानलंही जातं. त्यांनी अनेक स्तूपंही पाडली असावीत. असा अंदाज आहे. काही लोकांचं म्हणणं तसंच आहे व काहींचं म्हणणं वेगळंच आहे.
खिलजी वंश तसा शुरवीर वंशच. म्हटलं जातं की त्याला काहीतरी आजार झालेला होता. ज्याचेवर उच्चपदस्थ हकीमांनी उपचार केला. परंतु त्याला झालेला असाध्य आजार दूर झाला नाही. अशातच त्याला एका हकीमानं सांगीतलं की अशा आजारावर औषध हे नालंदाच्या ग्रंथालयातच मिळू शकते. मग काय, तो नालंदात गेला. जिथं भव्यदिव्य ग्रंथालय होतं. त्यानं प्रश्न मांडला. उत्तरार्थी तेथील महंतानं तेथीलच ग्रंथालयात अस्तित्वात असलेली औषधीची पुस्तके चाळली व उपाय शोधून काढला. जो उपाय केल्यानं खिलजीला झालेला असाध्य आजार बरा झाला. परंतु खिलजी हा उदारमतवादी स्वभावाचा नव्हताच. त्यानं नकारात्मक विचार केला. विचार केला की आपल्याला ज्या पुस्तकातून फायदा झाला. तशा स्वरुपाचे आजार जर भविष्यात कोणाला झाले. तर त्यावर उपाय सापडू नयेत. त्यामूळं अशी तत्वज्ञानाची पुस्तकच अस्तित्वात असू नयेत. म्हणूनच त्यानं नालंदा व तक्षशिलेची ग्रंथालयं जाळलीत. कोणी लोकं यापाठीमागं दुसरंच कारण देतात. म्हणतात की खिलजीच्या असाध्य आजारावर नालंदाच्या ग्रंथालयात उपचारच न सापडल्यानं राग येवून त्यानं संपूर्ण ग्रंथालय जाळून टाकलं. आता यात काय सत्य व काय असत्य ते जरी माहीत नसलं तरी आताचा समाज खिलजीच्या त्या कृत्यावर धार्मिक रंग चढवितात व नालंदा जाळण्याचं कारण धर्मवाढ सांगून समाजात धार्मिक तेढ निर्माण करतात व धार्मिक युद्ध घडवून आणतात.
अर्वाचीन काळातही अनेक धर्मयुद्ध झालीत. म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचा अतिशय राग आल्यानं दक्षिणेत आलेला अफजलखान वाईला तुळजापूर, पंढरपूर मार्गे निघाला. रस्त्यात त्यानं अनेक गाई, पशू मारले. त्यानंतर त्यानं अनेक देवळंही पाडली. ज्यात स्तूप व काही प्राचीन जैन मंदिरंही असतीलच. ज्यातून तमाम, वैदिक, तमाम बौद्ध व तमाम जैन धर्मीय लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली. तरीही धार्मिक स्तरावर कोणाचंच रक्त खवळलं नाही. कारण त्यावेळचा इतिहास हा धर्म पाहात नव्हता तर तो एक माणूसकी पाहात होता. ज्यात शिवरायांनी अफजलखानाच्या कृत्यांकडं एक माणूस म्हणून पाहिलं. ज्यात त्यांना त्याच्यात एक अविवेकी माणूस सापडला. शिवरायांनी अफजलखानाच्या प्रार्थनास्थळे पाडणे, मुर्त्या खंडीत करणे, तोडणे व पशूधन कापण्याच्या कृतीला धार्मिक रंग चढविला नाही. त्याचं कारण होतं, त्यांच्यात असलेली सहिष्णूता. ज्या सहिष्णूतेतून त्यांच्या सैन्यात उच्च पदावर मुस्लिम मंडळीही बसली होती. जी इमानदार होती. ती शिवरायांना जीव की प्राण मानत होती. अन् शिवरायही त्यांच्यावर जीव की प्राण ओवाळून टाकत असत. हीच माणसं शिवरायांना माणूसकीच्या नात्यानं मदत करीत असत. हाच विचार तमाम कितीतरी काळापासून चालत आला होता.
मुळचे वैदिक असलेल्या धर्मातील काही लोकं हे सहिष्णू होते. त्यांचं शक्यतोवर धर्मासाठी रक्त खवळत नव्हतंच. हं, पुष्पमित्र शृंगानं राजा बनताच अनेक बौद्धांची हत्या केली. त्यांना हाकलून लावले. अनेक स्तूपं पाडली. ज्यात त्या राजांची अमानुषता व अविवेकीपणा. असंच घडलं इब्राहिम खान लोदींच्या शासनकाळात. त्यानंही तमाम अस्तित्वात असलेल्या वैदिक लोकांना हिंदू म्हटलं. हिंदूचा अर्थ हा हिन आणि दुबळे. यावरुन खरंच वैदिक संस्कृतीत वाढलेली ही मंडळी हिन व दुबळी होती काय? याचं उत्तर नाही असंच येतं. येथील मूळ असलेले द्रविड, ज्यातून पुढे चालून वैदिक, जैन व बौद्ध बनले. त्यांचं रक्त हे दुबळं व हिन जाणवणारं नव्हतंच. मग ते इब्राहिम खान लोदीला हिन आणि दुबळं कसं दिसलं? त्याचं कारण आहे, येथील लोकांमध्ये असलेली सहनशिलता. येथील मुळातील द्रविड वंशातील लोकांचं रक्त हे सहनशील आहे. त्यामुळं साहजीकच येथूनच अस्तित्वात आलेल्या जैन व बौद्ध धम्मातील लोकांचं रक्तही सहनशील आहे. ते स्वतः कचतात. परंतु कोणाला कापत नाहीत. वैदिक धर्मातील लोकांनीही तशीच कृती केली. जी इब्राहिम खान लोदीला दिसली. म्हणूनच येथील वैदिक मंडळी ही हिंदू अर्थात हिन दुबळी ठरली. परंतु ती हिन व दुबळी नव्हतीच.
भारत हा आमचा देश आहे व येथील लोकांचं रक्त सहजासहजी खवळत नाही आणि खवळलं तर ते रक्त कोणाला सोडतही नाही. माणसाच्या अविवेकीपणाला दोष देणारे आमचे तमाम थोर पुढारी. ज्यात संभाजी महाराजच नाही तर आमचे पुर्वज असलेले पृथ्वीराज चव्हाण, राजा दाहिर होवून गेलेत की ज्यांनी शत्रूंना सतरा वेळेस हारवलं व मोठ्या मनानं माफ केलं. परंतु शत्रूंनी त्यांना कपटानं हारवलं. पकडलं व हालहाल करुन मारलं. त्यानंतर तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर आणि इतर सर्व तमाम थोर पुण्यात्म्ये. त्यांचेही परकीय समजणाऱ्या आपल्याच लोकांनी हालहाल केले. त्यांनी केवळ माणसांच्या अविवेकीपणाला दोष दिला. धर्माला नाही. मात्र काही लोकांनी माणसांची अविवेकीपणा जबाबदार धरला नाही. त्यांनी धर्मालाच जबाबदार धरले व धर्मालाच दोषी धरले. ज्यातून धार्मिक युद्ध झालीत. धार्मिक युद्ध होत गेली. अन् आजही त्याच धर्तीवर धार्मिक वाद होतात. समाजात धार्मिक तेढी निर्माण होतात व धार्मिक दंगेही पसरतात.
विशेष सांगायचं झाल्यास या भारतात राहणाऱ्या तमाम लोकांनी आजच्या काळात धार्मिक युद्ध घडवावीत काय? माझा धर्मच श्रेष्ठ आहे. इतरांचा धर्म श्रेष्ठ नाही. असं मानावं काय? याचा अर्थ नाही असा आहे. त्याचं कारण आहे आपण भारतात राहणारे भारतवाशी. आपण जरी या भारतात हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, पारशी, बौद्ध, जैन म्हणून राहात असलो तरी आपण सर्व त्याआधी भारतीय आहोत व द्रविड आहोत. अन् जे कोणी द्रविड मानत नसतील. त्यांनी नक्कीच स्वतःला विदेशीच समजावं. कारण येथील मुळचा व्यक्ती हा द्रविडच आहे. ज्याला त्याचा धर्मही कोणता ते माहीत नव्हतं. ते येथेच बाहेरुन आलेल्या आर्यांनी शिकवलं, ज्यातून ते वैदिक ठरले. पुढे याच द्रविडांचे बुद्ध, जैन झाले. पुढे याच तीन धर्माचे आणखी तुकडे झाले व काही मुस्लिम झाले. हे विसरता कामा नये. म्हणजेच सर्वच धर्माचे लोकं हे द्रविडांपासून अस्तित्वात आले. हे नाकारता येत नाही. कारण मुळच्या द्रविडांचं धर्मपरीवर्तन हे कधी जोर जबरदस्तीनं झालं तर कधी महत्व समजून आल्यानं. आपण मुळच्या जुन्याच द्रविडांचे वंशंज आहोत. त्याचं द्रविडांचं रक्त अंश प्रमाणात का असेना, आपल्यात आहे. अन् ते अनुवंशशास्त्रानुसार थोडं थोडं आलेलं आहे. जे रक्त सहिष्णू आहे. ते रक्त लवकर खवळूच शकत नाही आणि खवळूही नये. तसंच ते रक्त आपल्याच पुर्वजांचं आहे. जे रक्त आपल्याच नात्यातील आहे. असं जर आहे तर मग ते रक्त का खवळावं आज धर्माच्या नावावर? ते रक्त का खवळू द्यावं आपण आज कोणत्याही धर्माच्या नावावर? तसेच आपण आज जरी वेगवेगळ्या धर्मातील असलो तरी आपण आज मुळच्या द्रविडांचे रुपांतर असल्यानं व सहिष्णू असल्यानं आपण आपल्यात धार्मिक तेढ निर्माण न होवू देता तमाम भारतात राहणारे आम्ही सर्व भारतीय आहोत. हीच भावना सर्वांनी मनात बाळगावी.
निर्माण करावी. जरी आज आपण इतर धर्मात अधिवास करीत असलो तरी. जेणेकरुन या देशात धार्मिकतेवरुन कोणतेच वाद वा दंगली होणार नाहीत. शांतता टिकेल व सुव्यवस्थाही राहिल. हे तेवढंच खरं. आपण सर्व धर्मियांनी एकमेकांशी भावाबहिणींच्याच नात्यानं राहावं. कुणीच कुणाचं निदान धर्मासाठी तरी रक्त सांडवू नये म्हणजे पावलं. कारण या भारतात राहणारे आपण सर्व वेगवेगळ्या धर्मातील लोकं एकाच आईची लेकरं आहोत. आपण सर्व भारतीय व भारतवाशी आहोत. हे नाकारता येत नाही.
-अंकुश शिंगाडे