प्लॉटच्या वादातून चाकूहल्ला; एकाचा मृत्यू, एक जखमी
परतूर/प्रतिनिधी/ मंठा तालुक्यातील गुळखंड तांडा येथे प्लॉटच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता.११) सकाळी घडली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अलका नवनाथ राठोड (वय २५, रा. गुळखंड तांडा, ता. मंठा, जि. जालना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गुळखंड तांडा येथील वादग्रस्त मोकळ्या प्लॉटवर हा प्रकार घडला.फिर्यादीचे सासरे भाऊसाहेब रावसाहेब राठोड हे प्लॉटच्या वादाबाबत आरोपींशी बोलत असताना आरोपींनी गैरकायद्याची जमावबंदी करून हातात चाकू, लाठ्या व दगड घेऊन शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. आरोपी रावसाहेब सिताराम राठोड यांनी इतरांना “याला धडा शिकवा” असे सांगितल्याने सर्वांनी मिळून भाऊसाहेब राठोड यांना मारहाण केली.त्यावेळी आरोपी साईनाथ रावसाहेब राठोड याने चाकूने भाऊसाहेब राठोड यांच्या पोटात वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान आवाज ऐकून फिर्यादीचे पती नवनाथ भाऊसाहेब राठोड हे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपी संतोष रावसाहेब राठोड व सोहम संतोष राठोड यांनी “यालाही जिवंत सोडू नका” असे म्हणत नवनाथ राठोड यांच्यावरही पोट, पाठ व मांडीवर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
तसेच भांडण सोडवित असताना आरोपी विराट साईनाथ राठोड याने फिर्यादी अलका राठोड यांच्या उजव्या हातावर काठीने मारहाण केली. तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सुरेखा एकनाथ राठोड यांच्यावर आरोपी स्तिष संतोष राठोड यांनी दगड फेकून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर गावकऱ्यांनी जखमींना उपचारासाठी कलावती हॉस्पिटल, जालना येथे नेले असता डॉक्टरांनी भाऊसाहेब रावसाहेब राठोड यांना तपासून मृत घोषित केले.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रावसाहेब सिताराम राठोड, साईनाथ रावसाहेब राठोड, संतोष रावसाहेब राठोड, सोहम संतोष राठोड, स्तिष संतोष राठोड, विराट साईनाथ राठोड, वंदना साईनाथ राठोड व संगिता संतोष राठोड (सर्व रा. गुळखंड तांडा, ता. मंठा, जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.