शरद पवारांसाठी संजय राऊतांचा आदित्य ठाकरेंना शह
भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला
संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावाला समर्थन देत प्रियांका चतुर्वेदीचा पत्ता कट करण्याचा धूर्त डाव खेळत आदित्य ठाकरेंनाच शह दिला, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रियांका या आदित्य ठाकरे यांच्या कट्टर समर्थक असून त्यांचे नाव डावलून पवारांचे नाव पुढे करणा-या राऊतांनी आपण आदित्य ठाकरेंना किती किंमत देतो हे दाखवून दिल्याचेही ते म्हणाले. प्रियांका यांना राज्यसभेची यंदा संधी मिळाली तर राऊतांची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही हे माहिती असल्यानेच राऊतांनी ही चाल खेळल्याचे शरसंधान त्यांनी साधले.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला किंमत नाही
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्यसभेमध्ये काँग्रेसला संधी मिळावी अशी भले कितीही इच्छा असली तरी मविआमध्ये काँग्रेसचे स्थान नगण्य आहे. काँग्रेसला ना राज्यसभेची ना विधान परिषदेमध्ये संधी मिळणार आहे. राज्यसभेमध्ये शरद पवार तर विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांची वर्णी लागणार त्यामुळे मविआमध्ये काँग्रेसचा ‘वापरा आणि फेका’ असा वापर होतो असा प्रहार श्री. बन यांनी केला.
रोहित पवारांचा प्रकाश झोतात रहाण्याचा प्रयत्न
अजितदादांच्या विमान अपघातानंतर रोज उठून पत्रकार परिषद घेणा-या रोहित पवारांना लक्ष्य करत श्री. बन म्हणाले की रोहित पवार न्यायासाठी लढा देत नाहीत तर या दुर्दैवी अपघाताचे राजकारण करून प्रकाश झोतात रहाण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित आणि राऊत यांच्या होणा-या कथित भेटीवरून खिल्ली उडवत श्री. बन म्हणाले की राऊतांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित रोज उठून पत्रकार परिषदांमधून भोंगा वाजवत आहेत.
मराठी शाळेचा मुद्दा राऊतांनी उपस्थित करून अप्रत्यक्षरित्या ठाकरे बंधूंवर निशाणा साधल्याचा टोमणा श्री. बन यांनी मारला. उद्धव, राज यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकली हे सर्वांना ठाऊक आहे त्यामुळे हा टोला राऊतांनी ठाकरेंनाच लगावला असे ते म्हणाले. मराठीबद्दल प्रेमाचे उमाळे येणा-या राऊतांनी कॅमे-यासमोर पत्रकार परिषदांमधून भाजपा नेत्यांचा उद्धार करताना देणा-या शिव्यांना लगाम लावावा. कारण अशा भाषेमुळे मराठीचा अवमान होतो असा खोचक सल्लाही श्री. बन यांनी दिला.
–मुकुंद कुलकर्णी
