Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबाद“बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरवणारे शिक्षणमहर्षी म्हणजे डॉ. एस. एस. बनसोडे” – प्राचार्य...

“बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरवणारे शिक्षणमहर्षी म्हणजे डॉ. एस. एस. बनसोडे” – प्राचार्य डॉ. शिवाजी सूर्यवंशी

“बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरवणारे शिक्षणमहर्षी म्हणजे डॉ. एस. एस. बनसोडे” – प्राचार्य डॉ. शिवाजी सूर्यवंशी

छत्रपती संभाजीनगर – कालकथीत डॉ. श्रीपतराव एस. एस. बनसोडे यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त तसेच सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात कृतज्ञता, प्रेरणा आणि आठवणींचा संगम अनुभवायला मिळाला. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. शिवाजी सूर्यवंशी यांनी बनसोडे सरांच्या कार्याचा गौरव करताना भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचणे एक गोष्ट आहे; परंतु ते विचार आयुष्यात जगणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. डॉ. एस. एस. बनसोडे यांनी बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीतून जिवंत ठेवले,” असे ठामपणे सांगत सूर्यवंशी यांनी बनसोडे सरांना शिक्षणमहर्षी संबोधले.
तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाने प्रेरित होऊन संस्थेचे नाव, विद्यालयांची उभारणी आणि उपक्रमांची दिशा ठरवण्यात आली. “बाबासाहेबांच्या विचारांनी पछाडलेला माणूस समाजात परिवर्तनाची क्रांती घडवू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे बनसोडे सर,” असे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या उभारणीत अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहा ते दहा वर्षे विनावेतन काम करून दिलेले योगदान हे बनसोडे सरांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. एका छोट्या रोपट्यापासून सुरू झालेली ही संस्था आज वटवृक्ष बनली असून, कोणत्याही संकटाला न जुमानता ती अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. जालन्यात सुरू झालेल्या नव्या शाखेचा उल्लेख करत विविध विद्याशाखा सुरू करण्याचे बनसोडे सरांचे स्वप्न लवकरच साकार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा संस्थेच्या सचिव प्रमिलाताई गायकवाड यांनी बनसोडे सरांसोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या दूरदृष्टी, जिद्द आणि माणुसकीचा विशेष उल्लेख केला. सुभेदार रामजी हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक बनसोडे यांनी कुटुंबावर आलेल्या दुःखद प्रसंगानंतरही संस्थेची वाटचाल न खंडता सुरू ठेवण्याच्या संघर्षमय प्रवासाची भावनिक कहाणी मांडली.
यावेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सुजाता गायकवाड, कालिदास काकूळते, विजय राठोड, महेंद्र वानखेडे यांनी एस. एस. बनसोडे सरांचा पाळणा सादर करून वातावरण भारावून टाकले. संदीप बसैय्ये व प्रेरणा वाहुळे यांनी भावस्पर्शी कविता सादर केल्या, तर अजिंक्य लिंगायत यांनी काव्यरचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
जागृती बनसोडे यांनी आई-वडिलांच्या सहकार्याच्या आठवणी सांगत संस्थेच्या उभारणीचा प्रवास उलगडला.
कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमिलाताई गायकवाड, प्राचार्य डॉ. शिवाजी सूर्यवंशी, दीपक बनसोडे, पांडुरंग सोनकांबळे, रोहित बनसोडे, मनोरमा तिजारे, सुजाता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे पदाधिकारी, बनसोडे परिवारातील सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाने बनसोडे सरांच्या कार्याला अभिवादन करत नव्या उमेदीने पुढे जाण्याचा संदेश दिला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments