कोण होते नामदेव ढसाळ
ती म्हणाली कोण होते रे नामदेव ढसाळ ?
मी म्हणालो दीन दलितांच्या अन्याय अत्याचाराला
वाचा फोडत विद्रोहाचा वणवा पेटवणारे
क्रांतिकारी पँथर होते नामदेव ढसाळ.
ती म्हणाली एवढं काय केलं रे त्यांनी ?
मी म्हणालो महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी
दिलेल्या संविधानानुसार हक्क व अधिकार
तुझ्या माझ्यासारख्या गोर गरिबांना मिळवून दिले
ती म्हणाली तू एवढं का मानतोस त्यांना ?
मी म्हणालो दलित म्हणून हिनवलेल्या या समाजात
स्वाभिमान जागृत ठेवून कुणाच्या बापालाही
न घाबरण्याचे बळ देऊन गेले म्हणून
ती म्हणाली त्यांना ही व्यवस्था का दुर्लक्षित करते ?
मी म्हणालो या दलिंदर छिनाल व्यवस्थेला फाट्यावर
कोलत कुणालाही न भिता अन्यायाला वाचा
फोडत होते म्हणून
ती म्हणाली त्यांचं योगदान काय ?
मी म्हणालो साहित्यातून विद्रोहाची ज्वाला पेटवत दलितांना
संघटित होऊन लढण्यासाठी चळवळ उभारली,
व्यवस्थेला जाब विचारत दलितांच्या हिताचे
निर्णय घेण्यास भाग पाडले.
ती म्हणाली साहित्यात त्यांनी असं लिहिलं तरी काय ?
मी म्हणालो गोर गरिबांचे हक्क हिरावणाऱ्या छिनाल व्यवस्थेचे
वाभाडे काढत अन्यायाचा प्रतिकार करण्या लेखणीची
तलवार करून शब्दाशब्दाने चपराक सडकावले
ती म्हणाली काय केलं त्यांनी ?
मी म्हणालो आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवत दलित पँथर
या आक्रमक संघटनेची स्थापना करून दलित
शोषितांना न्याय मिळवून दिला.
ती म्हणाली तुला काय मिळालं त्यांच्यापासून ?
मी म्हणालो जागृत मस्तक ठेऊन निडरतेने अन्यायाला
वाचा फोडण्याचा वारसा अन तलवारीसारखी
धारदार विद्रोही लेखणी चालवण्याची प्रेरणा
– विजय नारायण वाठोरे