Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादकाँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये भाजपाचे माध्यम विभाग...

काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये

भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

     वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार विसरून काँग्रेसची गुलामगिरी करणाऱ्या राऊतांनी स्वाभिमानाची भाषा करू नये, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार स्वाभिमानाने करण्यात आला असून त्यातून देशाचा फायदाच होणार असल्याचेही श्री. बन यांनी नमूद केले.

भारत- अमेरिका व्यापार करार भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा

          भारत-अमेरिका व्यापार करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतमाता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चरणी गुलाम ठेवली असा  आरोप करणा-या राऊतांचा खरपूस समाचार घेत श्री. बन म्हणाले की, भारत-अमेरिका व्यापार करार हा ताठ मानेने, देशहिताला प्राधान्य देत करण्यात आलेला आहे. त्यात कोणतीही गुलामगिरी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा आहे.

महापालिकेमध्ये दाऊदच्या घोषणा द्यायच्या का?

     महापालिका सभागृहात घुमलेल्या ‘मोदी, मोदी’ आणि ‘देवाभाऊ’च्या घोषणांनी राऊतांना आणि विरोधकांना कानठळ्या बसल्या. कारण भाजपा महायुती सरकारच्या विकास, पारदर्शकता आणि ठाम निर्णयक्षम नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची पोचपावती या घोषणांतून दिसली. महापालिकेमध्ये पंतप्रधान मोदी आणि देवा भाऊंच्या घोषणा द्यायच्या नाही तर काय राऊत किंवा दाऊदच्या घोषणा द्यायच्या का? असा खोचक सवालही श्री. बन यांनी केला .

अजितदादांच्या अपघाताबाबत रोहीत पवारांचे राजकारण

      अजित दादांचा विमान अपघात हा अत्यंत दुर्दैवी होता, या अपघाताची गंभीर दखल केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही स्तरांवर घेतली गेली आहे. केंद्र सरकार, एअरपोर्ट अथॉरिटी तसेच राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. शरद पवार यांनीही या अपघातात घातपाताची शक्यता फेटाळून लावली असताना अशा संवेदनशील प्रकरणात रोहित पवार जाणीवपूर्वक खोटे आणि निराधार आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीका श्री. बन यांनी केली.

संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार  

      अजित दादांनी शेवटच्या दिवशी कोणत्या फाईलवर स्वाक्षरी केली, याची अधिकृत माहिती राज्य सरकारकडून मिळेल. भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या फाइल्स स्व. अजितदादांकडे होत्या अशी आरडाओरड करत नाहक पत्रकार परिषदांमधून हवेत तीर मारण्याऐवजी राऊतांकडे या संदर्भात कोणतेही ठोस पुरावे असतील, तर ते संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत असे आव्हान श्री. बन यांनी दिले. योग्य तपास करून सत्य समोर आणले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली .

    माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दांत राऊतांनी केलेल्या टीकेवर पलटवार करत श्री. बन म्हणाले की, कोवीड काळात राऊत आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रासमोर उघडे करण्याचे काम तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. श्री. कोश्यारी नसते तर कोविड काळात महाराष्ट्राचे वाटोळे तुम्ही केले असते असा हल्लाबोल श्री. बन यांनी केला.

 –मुकुंद कुलकर्णी 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments