‘मुक्त’च्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेला
‘लिगसी ऑफ लिटरेचर’ पुरस्कार
नाशिक/प्रतिनिधी/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेस ‘उर्दू चॅनल’ संस्थेतर्फे मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे झालेल्या ‘जश्न-ए-उर्दू’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय उर्दू महोत्सवात ‘लिगसी ऑफ लिटरेचर पुरस्कार-२०२६’ ने सन्मानित करण्यात आले. उर्दू भाषा आणि उर्दूतील गौरवशाली साहित्यिक परंपरेच्या प्रचार-प्रसार, संवर्धन आणि विकसनातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्मृतीचिन्ह व मानपत्र स्वरूपातील हा पुरस्कार मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेचे संचालक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी व्यासपीठावर ‘उर्दू चॅनल’ चे संचालक डॉ. कमर सिद्दिकी, मुंबई विद्यापीठ उर्दू विभागप्रमुख डॉ. अब्दुल्ला इम्तियाज, जम्मू विद्यापीठ उर्दू विभागप्रमुख प्रा. शहाब मलिक, महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे सदस्य सचिव प्रा. कासीम इमाम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेतर्फे उर्दूमधील बी.ए. आणि एम.ए. शिक्षणक्रम उपलब्ध आहे. त्याअंतर्गत उर्दू भाषा व त्यातील विविध साहित्य प्रकारावर दर्जेदार पाठ्यपुस्तके निर्माण करून असंख्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे उर्दू साहित्य परंपरेतील कित्येक नवतरुणांना प्रेरणा मिळाली. तसेच, उर्दू भाषिक-सांस्कृतिक परंपरेतील अनेक महत्वाच्या विषयांवर विद्याशाखेने सरकारी, गैर-सरकारी संस्थांसोबत राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले. अशा अनेकविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्याशाखेतर्फे उर्दू भाषा, संस्कृती आणि साहित्य यांच्या उत्थानासाठी मोलाचे योगदान देण्यात आले असल्याचे याप्रसंगी देण्यात आलेल्या पुरस्कार मानपत्रात नमूद करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, व प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्यासह मान्यवरांनी या पुरस्काराबद्दल मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखा संचालक व शैक्षणिक संयोजक, अधिकारी – कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. गेल्या पंचवीस वार्षांपासून उर्दू भाषा आणि साहित्याच्या प्रचारासाठी कार्यरत असणाऱ्या ‘उर्दू चॅनल’ या संस्थेने ‘रुट्स ऑफ काइंडनेस फाउंडेशन’ ही संस्था व मुंबई विद्यापीठाचा उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा आंतरराष्ट्रीय उर्दू महोत्सव आयोजित केला होता. यावेळी विद्यापीठातील डॉ. राशीद खान, डॉ. शाहीन शेख, डॉ. संजय खरात, डॉ. सुनील गवांडे, डॉ. बाळासाहेब दिघे व डॉ. पन्नालाल धुर्वे आदी उपस्थित होते.
