चिंचोली येथे विधवा व वृद्धांसह सर्वसमावेशक स्त्रीत्वाचा जागर; हळदीकुंकू आणि आरोग्य कार्यशाळा संपन्न
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील चिंचोली (लिं.) येथे स्त्रीत्वाचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा एक अनोखा उपक्रम पार पडला. स्थानिक कला व विज्ञान महाविद्यालयातील गृहविज्ञान विभाग आणि आजीवन शिक्षण व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू निमित्ताने ‘महिलांची रजोनिवृत्ती व उपाययोजना’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजात अनेकदा उपेक्षित राहणाऱ्या विधवा आणि वृद्ध महिलांना सन्मानाने आमंत्रित करून ‘सर्वसमावेशक स्त्रीत्वाचा’ संदेश देण्यात आला.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन: रजोनिवृत्तीकडे सकारात्मकतेने पाहा
कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्ना देवरे यांनी रजोनिवृत्ती (Menopause) या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “रजोनिवृत्ती ही आजार नसून ती एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. या काळातील बदलांना न घाबरता आनंदाने सामोरे जावे आणि उतारवयात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन आनंदी राहावे.”
दुसऱ्या मार्गदर्शिका डॉ. वंदना बनकर यांनी रजोनिवृत्तीच्या काळात घ्यावयाचा योग्य आहार आणि व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले.
पथनाट्य आणि स्पर्धांचा उत्साह
कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी माधुरी भुजंग व कावेरी ढवळे यांनी ‘विधवा सन्मान’ या विषयावर हृदयस्पर्शी पथनाट्य सादर केले. केवळ हळदीकुंकू न करता महिलांसाठी उखाणे व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, विजेत्यांना बक्षीस म्हणून ‘कडधान्य’ देऊन आरोग्याचा संदेश देण्यात आला.
प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता खंडागळे होत्या. याप्रसंगी गावातील वंदना पवार यांच्यासह परिसरातील विधवा, वृद्ध व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सायली बिलंगे व रोहिणी बिलंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा आघार्डे व सौ. शुभदा कुलकर्णी यांनी केले. आरोग्याचे ‘वाण’ देऊन या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
