Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसाची जिवणे ही विंचुर्णे - बर्दापूरकर स्मृती पारितोषिकाची मानकरी

साची जिवणे ही विंचुर्णे – बर्दापूरकर स्मृती पारितोषिकाची मानकरी

साची जिवणे ही विंचुर्णे – बर्दापूरकर स्मृती पारितोषिकाची मानकरी

छत्रपती संभाजीनगर :- महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या पदवी परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली गुणवंत विद्यार्थिनी साची चंदू जिवणे हिला यंदाचे मंगला विंचुर्णे–बर्दापूरकर स्मृती पारितोषिक जाहीर झाले आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर आणि कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडियाच्या प्राचार्या डॉ.रेखा शेळके यांनी ही माहिती दिली.

मराठी पत्रकारितेतील ज्येष्ठ संपादक मंगला विंचुर्णे–बर्दापूरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या या पारितोषिकाचे हे पाचवे वर्ष आहे. एमजीएम विद्यापीठ आणि बर्दापूरकर कुटुंबीय यांच्या संयुक्त योगदानातून हे पारितोषिक सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये रोख रक्कम व स्मृतिचिन्हाचा समावेश आहे. शैक्षणिक गुणवत्ता, पत्रकारितेतील बांधिलकी आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा सन्मान म्हणून हे पारितोषिक दिले जाते.

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडिया मधील विनोबा भावे सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दैनिक सकाळचे समूह संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते साची जिवणे हिला सन्मानित करण्यात येईल. कार्यक्रमासाठी कुलपती अंकुशराव कदम आणि ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांची विशेष उपस्थिती असणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ हे असणार आहेत.

पुरस्कार वितरणानंतर राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त संपादक सम्राट फडणीस हे ‘एआय युगातील पत्रकार : कौशल्य, जबाबदारी आणि भविष्य’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

साची जिवणे : चंद्रपूर जिल्ह्यातील साची जिवणे ही पत्रकारितेची विद्यार्थिनी असून तिने बीबीसी मराठी, लोकमत टाईम्स, युनिसेफ आणि बाईमाणूस पोर्टल येथे प्रत्यक्षपणे कामाचा अनुभव घेतला आहे. इंग्रजी बातमी लेखन, संपादन, स्टोरीटेलिंग, कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडिया न्यूज प्रॉडक्शनमध्ये ती कुशल आहे. स्क्रिप्टिंग, व्हिज्युअल पॅकेजिंग, मल्टी-कॅमेरा स्टुडिओ ऑपरेशन्स आणि अँकरिंगचा अनुभवही तिला आहे. राष्ट्रीय युवा संसदेत तिला दोनदा ‘बेस्ट पार्लमेंटेरियन’चा सन्मान मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments