सोयगाव येथील जि.प. कें.शाळेत विद्यार्थ्यासाठी ‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँकेचे उदघाटन
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/
दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी मा. दिलीप स्वामी यांच्या प्रेरणेने तसेच गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा, सोयगाव येथे ‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँक’ हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरु करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन तिरूपती अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापक विकास देसाई यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत गायकवाड, उपाध्यक्षा राधाबाई सोनवणे, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष रविंद्र काळे, सदस्य तथा नगरसेवक हर्षल (बंटी) काळे, शिक्षणप्रेमी व समाजसेवक राजेंद्र दुतोडे, प्रशालेचे अध्यक्ष सुनील ठोंबरे, तसेच दुर्गाबाई निकुंभ, रविंद्र साखळे, रामेश्वर शिरसाठ, वैशाली सोनवणे आदी मान्यवराच्या हस्ते करण्यात आले विशेष बाब म्हणजे या बँकेत खऱ्या बँकेप्रमाणेच संपूर्ण व्यवहार प्रक्रिया विद्यार्थ्यी स्वतः करून प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत.
शाळेने या उपक्रमासाठी छापील बँक चेक, विड्रॉल स्लिप (रक्कम काढण्याचे अर्ज), नोंदवही व आवश्यक कागदपत्रे तयार करून आणली होती. प्रत्यक्ष बँकेत जसे चेक भरून पैसे काढले जातात, त्याच पद्धतीने रक्कम काढण्यासाठी विड्रॉलचा स्लिप व रक्कम भरण्यासाठी भरणा स्लिप विद्यार्थ्यांच्या बचत बँकेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जणू शाळेच्या आवारातच एक स्वतंत्र बँक सुरू असल्याचा अनुभव विद्यार्थ्याना येत आहे.
या व्यवहारात विद्यार्थी कॅशिअर, लिपिक व व्यवस्थापक यांनी पैसे मोजणे, नोंद करणे, चेक तपासणे, जमा–खर्चाची नोंद घेणे अशी सर्व कामे मोठ्या जबाबदारीने पार पाडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बँकेतील प्रत्यक्ष व्यवहार कसे होतात, पैसे कसे हाताळले जातात आणि आर्थिक शिस्त किती महत्त्वाची असते याची खरी जाणीव होत आहे.
या विद्यार्थी बचत बँकेत कॅशिअर म्हणून सृष्टी अण्णा वाघ, लिपिक म्हणून शुभ्रा दत्तात्रय सोहनी, व्यवस्थापक म्हणून प्राची नितीन सोनवणे तर सहाय्यक म्हणून लावण्या किशोर खैरे यांनी जबाबदारी सांभाळली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय, व्यवहारिक बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता व नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
*या संपूर्ण उपक्रमामागे शाळेचे कृतिशील व दूरदृष्टी असलेले मुख्याध्यापक किरण कुमार पाटील यांची संकल्पना व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्यावर भर देणारा हा उपक्रम त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. कार्यक्रमास पंकज रगडे, मंगला बोरसे मॅडम, रामचंद्र महाकाळ , सुरेखा चौधरी , प्रतिभा कोळी , गणेश बाविस्कर ,बिलाल बागवान सर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते*
‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँक’ हा उपक्रम ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाला व्यवहारिकतेची जोड देणारा ठरत असून, इतर शाळांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.