वाशिम व मानवत रोड डेपो येथे टॉवर कारचे कमिशनिंग तसेच मानवत रोड डेपो येथे मॉडेल ओएचईची उभारणी
01) वाशीम व मानवत रोड डेपो येथे टॉवर कारचे कमिशनिंग
नांदेड विभागातील ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन (TRD) विभागाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने वाशिम डेपो येथे दिनांक 19.11.2025 रोजी तसेच मानवत रोड डेपो येथे दिनांक 03.12.2025 रोजी अशा एकूण 2 नवीन टॉवर कारचे कमिशनिंग करण्यात आले आहे.
टॉवर कार ही TRD विभागाची अत्यंत महत्त्वाची यांत्रिक मालमत्ता असून तिचा उपयोग प्रामुख्याने तत्काळ ब्रेकडाऊन अटेंडन्स तसेच ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) च्या नियमित देखभाल व दुरुस्ती कामांसाठी केला जातो. नांदेड विभागात एकूण 11 TRD डेपो असून यापूर्वी केवळ 9 टॉवर कार उपलब्ध असल्यामुळे ब्रेकडाऊनच्या वेळी तातडीने काम थोडेशे अवघड होत होते व गाड्यांच्या विलंबाची शक्यता निर्माण होत होती.
नवीन 2 टॉवर कारच्या समावेशामुळे आता एकूण 11 टॉवर कार उपलब्ध झाल्या असून, प्रत्येक डेपोसाठी एक टॉवर कार उपलब्ध झाली आहे. यामुळे ब्रेकडाऊनवर जलद गतीने कारवाई करणे शक्य होणार असून, गाड्यांचा विलंब कमी होण्यास तसेच विद्युत ट्रॅक्शन मालमत्तेची विश्वासार्हता व देखभाल कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
02) मानवत रोड डेपो येथे मॉडेल ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) ची उभारणी
नांदेड विभागात ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन (TRD) विभागाची नुकतीच स्थापना झालेली आहे. विभागातील संपूर्ण रेल्वे वाहतूक विद्युत इंजिनांद्वारे चालवली जात असल्याने, नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लाईव्ह ओएचईवर प्रशिक्षण देताना पॉवर ब्लॉक व ट्रॅफिक ब्लॉक यासंबंधी अडचणी येत होत्या.
या समस्येवर उपाय म्हणून मानवत रोड TRD डेपो परिसरात दिनांक 25.11.2025 रोजी मॉडेल ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) उभारण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये सर्व मानक ओएचई साहित्य व उपकरणांची उभारणी करण्यात आलेली आहे.
ही सुविधा नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येणार असून, यामुळे कर्मचारी ओएचईचे विविध घटक प्रत्यक्ष पाहू व हाताळू शकतील, तांत्रिक संज्ञांचे ज्ञान मिळवू शकतील तसेच कोणताही पॉवर ब्लॉक किंवा ट्रॅफिक ब्लॉक न घेता सुरक्षित, प्रभावी व सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे.
