तांड्यांना स्वतंत्र महसूल गाव व ग्रामपंचायत करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक
आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यास संपादन
नागपूर : तांड्यांना स्वतंत्र महसूल गाव व स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याबाबत राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे पार पडणार आहे. ही बैठक रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत जालना जिल्ह्यासह राज्य भरातील तांड्यांना स्वतंत्र महसूल गाव व स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. महसूल व वन विभाग, ग्रामविकास विभाग तसेच संबंधित जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
महसूल विभागाच्या नागपूर येथील शासकीय कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित प्रकरणांची सविस्तर टिपणी व आवश्यक माहिती आधीच सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बैठकीदरम्यान सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी VC द्वारे उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी परतूर–मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. तांड्यांना स्वतंत्र ओळख, प्रशासनिक सुविधा व विकासाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी आमदार लोणीकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून हा विषय प्राधान्याने मांडला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच सदर बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.