राष्ट्रीय जलतरणमध्ये लोहपुरुष
कैलास झोळगे यांची सुवर्णझेप
जालना/प्रतिनिधी/ स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया (एस. एफ. आय.) यांच्यावतीने 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान हैदराबाद येथील जी.एम.सी. बालयोगी गच्चीबोली आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडलेल्या 21 व्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत जालन्याचे अष्टपैलू जलतरणपटू व प्रशिक्षक कैलास गजाननराव झोळगे यांनी दैदिप्यमान कामगिरी बजावत 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह मणिपूर, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, चंदिगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, ओडिशा, गुजरात आदी 30 राज्यांमधून 1200 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणपटू सहभागी झाले होते. अशा तीव्र स्पर्धात्मक वातावरणात कैलास झोळगे यांनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावून जालन्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले. महिनाभरापूर्वीच जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या “हाफ आयर्नमॅन 2025 या प्रतिष्ठित स्पर्धेत कैलास झोळगे यांनी अभूतपूर्व कामगिरी करत “लोहपुरुष” हा बहुमान पटकावून ते जालन्याचे पहिले आयर्नमॅन ठरलेले आहेत. त्यामुळे जालना शहराचा क्रीडाअभिमान अधिकच उंचावला आहे.
कैलास झोळगे यांच्या या शानदार यशाबद्दल विविध क्रीडा संस्था, क्रीडाप्रेमी नागरिक, विद्यार्थी व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जालना जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील हा अभिमानाचा क्षण मानला जात असून त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.