Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दोन दिवसीय संशोधन कार्यशाळा संपन्न!

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दोन दिवसीय संशोधन कार्यशाळा संपन्न!

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात

दोन दिवसीय संशोधन कार्यशाळा संपन्न!

नाशिक/प्रतिनिधी/  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रा. राम ताकवले संशोधन व विकसन केंद्र आणि ज्ञानस्त्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “Research Visibility, Ethical Publishing and Use of AI Tools in Research” (संशोधन दृश्यमानता, नैतिक प्रकाशन आणि संशोधनात ए. आय. साधनांचा वापर) या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर दिनांक १९ आणि २० नोव्हेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाली. राज्यभरातील ९१ संशोधक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला.

विद्यापीठाच्या यश इन सभागृहात झालेल्या कार्यशाळा समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते. व्यासपीठावर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक व केंद्रीय विद्यापीठ, हरियाणाचे ग्रंथपाल प्रा. संतोष सी. एच, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या तथा प्रा. राम ताकवले संशोधन व विकसन केंद्राच्या प्रमुख प्रा. डॉ. संजीवनी महाले, विद्यापीठ ज्ञानस्तोत्र केंद्राचे प्रमुख डॉ. प्रकाश बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी संशोधन लिखाणात संशोधकाने नैतिकता तर पाळलीच पाहिजे परंतु त्यात त्याचा स्वत:चा एक वेगळा बाणा दिसला पाहिजे. त्यात लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचे न्याय स्पष्टीकरण त्यास देता आले पाहिजे. एआय आणि  तंत्रज्ञानाच्या या युगात बाह्यप्रेरणेपेक्षा स्वयंप्रेरणेने काम करत संशोधकाने आपल्या संशोधनातील ज्ञान कालबाह्य होण्याच्या आत संशोधन कार्य लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहन देखील त्यांनी शेवटी केले.

विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्रातील संगणक प्रयोगशाळेत सहभागी संशोधकांना सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान देण्यात आले. त्यात प्रामुख्याने प्रभावी ऑनलाईन शोध तंत्र आणि धोरणे, संशोधन आणि प्रकाशन कार्यांसाठी AI साधने आणि मुक्त प्रवेश संसाधने, नीती, नियम आणि AI साधनांच्या संदर्भात साहित्यिक चोरी टाळणे, प्रीडेटरी नियतकालिकांची ओळख: उपयुक्त साधने, मानके आणि तंत्रे, उद्धरण मेट्रिक्स: इम्पॅक्ट फॅक्टर, i10 इंडेक्स, i20 इंडेक्स, अल्टमेट्रिक्स या विषयांवर प्रात्यक्षिक आधारित व्याख्यान देण्यात आले. या सत्रांसोबतच ‘उपयुक्त सूचना, चर्चा आणि कार्यशाळेनंतरचे असाइनमेंट्स’ यावरही मार्गदर्शन करण्यात आले. समारोपप्रसंगी सहभागी संशोधकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. डॉ. भागवत कराडकर, श्री. संदीप किजवे व श्रीमती शुभांगी पाटील या सहभागी संशोधकांनी कार्यशाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. वसुदेव राउत यांनी सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन केले. या कार्यशाळेच्या आयोजनात डॉ. सचिन पोरे आणि राधिका शिंदे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments