तीन महिन्यात कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरणार-आमदार सतीश चव्हाण
कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे उत्तर
छत्रपती संभाजीनगर- परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध सुधारित करावयाची कार्यवाही जलद गतीने सुरू असून येत्या तीन महिन्यात सदरील विद्यापीठातील रिक्त पदे भरल्या जातील असे राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज (दि.24) विधान परिषदेत सांगितले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. सदरील विद्यापीठात वर्ग-1 ते वर्ग-4 ची जवळपास 1257 पदे रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापन व संशोधन कार्यास अडचणी येत असून रिक्त पदाच्या संख्येमुळे एका-एका प्राध्यापकास तीन-तीन पदाचे काम करावे लागत आहे. मागील वर्षी चार नवीन महाविद्यालये व दोन संशोधन केंद्र मंजूर झाले असून त्यासाठी अद्यापही पद निर्मिती केलेली नसल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने ही रिक्त पदे त्वरीत भरावीत अशी आग्रही मागणी सभागृहात केली.
आमदार सतीश चव्हाण यांच्या लक्षवेधीला उत्तर देतांना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध सुधारित करावयाची कार्यवाही जलद गतीने सुरू असून येत्या तीन महिन्यात सदरील विद्यापीठातील रिक्त पदे भरल्या जातील असे सभागृहात सांगितले.
