कागदपत्रांअभावी शासकीय योजनांपासून वंचित; आधार कार्डाचा प्रश्न गंभीर
वडीगोद्री/प्रतिनिधी/ विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळवून देण्यासोबतच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ शहापूर येथे राबविण्यात आले. महसूल विभाग, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग आणि भटके-विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
शिबिरात भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांच्या विविध शासकीय कागदपत्रे व योजनांशी संबंधित ४५० हून अधिक प्रकरणांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये आधार कार्डासाठी १२१, जात प्रमाणपत्रासाठी ९७, आयुष्मान भारत कार्डासाठी ६६, लाडकी बहीण योजनेसाठी १२०, राशन कार्डासाठी २३, जन्म प्रमाणपत्रासाठी १० आणि मतदान कार्डासाठी १२ प्रकरणांचा समावेश आहे. तसेच अपंग प्रमाणपत्र, निराधार पेन्शन, उत्पन्न प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्रासाठीही नागरिकांनी अर्ज केले.
विशेष म्हणजे, शिबिरादरम्यानच आयुष्मान भारत कार्डाची २०, राशन कार्डाची २ आणि आधार कार्डाची १३ प्रकरणे प्रत्यक्ष मार्गी लावण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिकांना तातडीने आवश्यक कागदपत्रे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
जन्मनोंदणीअभावी अनेक अडचणी भटक्या-विमुक्त समाजातील अनेक मुलांचा जन्म वाड्या-वस्त्यांमध्ये, घरी अथवा ऊसतोडीच्या फडांमध्ये झाल्याने त्यांची वेळेत जन्मनोंदणी झालेली नसते. परिणामी जन्म प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येतात. जन्म प्रमाणपत्र नसल्याने पुढे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे मिळविण्यातही अडथळे निर्माण होतात. याचा थेट परिणाम विविध शासकीय योजनांच्या लाभावर होत असल्याचे शिबिरातून समोर आले.
आधार कार्डाचा प्रश्न सर्वाधिक गंभीर असून, अशा नागरिकांसाठी विशेष प्रशासकीय तरतूद करून कागदपत्रांची प्रक्रिया अधिक सुलभ करावी, अशी मागणी अंबड तालुका अभियान संयोजक प्रा. आर. व्ही. छल्लारे यांनी केली.
या अभियानाचे मार्गदर्शन महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंढे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार डॉ. हिकमत उढाण, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, भटके-विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्याध्यक्ष डॉ. संजय पुरी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सोमेश मोहिते, जालना जिल्हा अशासकीय सदस्य विष्णु गिरी, विकास राठोड, दुष्यंत इघारे, मुकेश भारद्वाज व अंगद मिरडुदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी अंबडचे नायब तहसीलदार किरण खांडेभराड, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मंडळ अधिकारी एन. पी. बाळापुरे, तलाठी आयुब पठाण तसेच पंचायत समिती, भूमी अभिलेख, वन विभाग, आरोग्य विभाग व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.