मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून
सक्तीची वसूली करु नये- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
छत्रपती संभाजीनगर :- दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची सक्तीची वसूली करु नये असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीची वसूली करु नये,असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व मायक्रो फायनान्स कंपनी संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती. तसेच बिगर बॅंकींग वित्तीय संस्थाही यावेळी उपस्थित होत्या. अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक प्रेषित मोघे तसेच कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले की, दुष्काळामुळे शेतकऱ्यांची व ग्रामिण भागाची भीषण स्थिती आहे. अशा परिस्थितीत त्यांचे कर्ज अथवा अन्य प्रकारची वसूली करण्यासाठी सक्ती करु नये. त्यासंदर्भात रिजर्व बॅंकेच्या मार्गदर्शक सुचना आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांकडून वसूली करण्यात येऊ नये. तसेच अशा संस्थांना आपल्या अन्य व्यावसायिक कारणांसाठी गावकऱ्यांकडे जावयाचे असल्यास त्यांनी संबंधित गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी यांना सुचना देऊन जावे,असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकरी वा ग्रामस्थांनी कोणत्याही वित्तीय संस्थेकडून वसूलीसाठी तगादा वा सक्तीचा अवलंब केला जात असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे ०२४०- २३३१०७७ या क्रमांकावर अथवा १८०० १०२ १०८० या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा,असे आवाहनही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
