राज्यस्तरीय जिजाऊ कबड्डी चषकात रोमहर्षक लढती
जालना/प्रतिनिधी/ राज्यस्तरीय जिजाऊ कबड्डी चषक स्पर्धेचा 18 मार्च रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत सामने रंगले. पहिल्या दिवशी झालेल्या कुमारी गट (मुली) आणि कुमार गट (मुले) या दोन्ही विभागांतील सामन्यांमध्ये खेळाडूंनी अटीतटीची झुंज दिली. यात जालना शहर, मुंबई उपनगर, सांगली आणि परभणी या संघांनी दमदार कामगिरी करत विजय नोंदवले.
मुलींच्या गटात मुंबई उपनगर आणि पालघर यांच्यात झालेला सामना अत्यंत चुरशीचा ठरला. यात मुंबई उपनगर संघाने २४ गुण मिळवून पालघरवर केवळ १ गुणाने निसटता विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात यजमान जालना शहर संघाने धाराशिवचा 55-33 अशा 22 गुणांच्या मोठ्या फरकाने पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर तिसऱ्या सामन्यात सांगलीने बीडवर 45-17 अशा 28 गुणांच्या फरकाने मात करत विजय नोंदवला.
मुलांच्या गटातही सर्वच सामने शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाले. पहिल्या सामन्यात अहिल्यानगरने पालघरचा 45-30 असा 15 गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात परभणीने सांगलीवर 42-40 अशा केवळ 2 गुणांच्या फरकाने विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. मुंबई उपनगर आणि जालना शहर यांच्यातील लढतीत मुंबईने 46-42४ अशा 4 गुणांच्या फरकाने बाजी मारली. तर शेवटच्या सामन्यात बीडने छत्रपती संभाजीनगरचा 58-53 असा 5 गुणांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला.
या सर्व सामन्यांचे नियोजन पंच प्रमुख प्रा. डॉ. फुलचंद कदम (धाराशिव) आणि सहपंच प्रमुख प्रा. व्ही. जे. पाटोळे (जालना) यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात आले. स्पर्धेच्या पुढील फेरीत कोणते संघ बाजी मारतात, याकडे आता क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गुरुवार दि. 19 मार्च रोजी दुसऱ्या दिवशीचे सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 8 वाजेपासून सामन्यांना सुरुवात होणार असल्याचे संयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.
या चषकाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धेचे मुख्य संयोजक महात्मा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सत्संग मुंडे, सहसंयोजक विजय कामड, आयोजन समितीचे पदाधिकारी सुदामराव सदाशिवे, अॅड. शिवराम सतकर, सुभाष कोळकर, देवराव सोनवणे, ओमप्रकाश चितळकर, अरविंद देशमुख आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांच्या संयोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.
