‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार
आर्थिक मदतीसोबत स्वावलंबनासाठीही प्रयत्न – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.
छत्रपती संभाजीनगर :- दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबांना केवळ आर्थिक मदतीची नव्हे, तर भावनिक आधाराची आणि पुन्हा उभे राहण्यासाठी विश्वासाची गरज असते. शेतकरी आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीची हानी नसून संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला बसलेला मोठा आघात असतो. या कुटुंबांप्रति असलेल्या सामाजिक बांधिलकीतून जिल्हा प्रशासनाने ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी 157 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू असलेल्या किटचे वाटप करण्यात आले. संकटग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदतीसोबतच स्वावलंबनासाठीही प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुष्काळग्रस्त शेतकरी तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी संभाजी अडगुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड, अग्रवाल युवा मंचचे पदाधिकारी तसेच तहसीलदार शिवानंद बिडवे उपस्थित होते.
दुःखाची भरपाई शक्य नाही; मात्र अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाडा दुष्काळाच्या संकटाला सामोरा जात आहे. पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीसमोरील आर्थिक आव्हाने अशा अनेक अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्यात येणारी मदत ही त्यांच्या दुःखाची भरपाई करू शकणार नाही. मात्र, त्यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण निर्माण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कुटुंबीयांनी आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडाव्यात. त्यांना आवश्यक ते सहकार्य आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत मदत पोहोचविण्यास प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
२ लाख ३९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ११२ कोटी ६६ लाख रुपये जमा
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी शासनाकडून दिवाळी अग्रिम मदत वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ११२ कोटी ६६ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ३ लाख ५२ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येही येत्या दोन दिवसांत मदत जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना एक लाखाची मदत; अन्नधान्य किटचे वाटप
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. काही कुटुंबांना ही मदत मिळाली असून, उर्वरित पात्र कुटुंबांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आधार मिळणार आहे.
यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शितल धनवटे (ब्रम्हगव्हाण, ता. पैठण) यांनी मनोगत व्यक्त केले. संकटाच्या काळात मिळणारा आधार आणि मदतीचा हात कुटुंबाला पुन्हा उभे राहण्याचे बळ देतो, ही भावना त्यांच्या मनोगतातून व्यक्त झाली.
शेळीपालन, कुक्कुटपालनातून आर्थिक स्वावलंबनाला चालना
आर्थिक मदतीसोबतच कुटुंबांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमात भर देण्यात येत आहे. कुटुंबातील १८ वर्षांवरील सदस्यांना शेळीपालन आणि कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. संकटग्रस्त कुटुंबांना केवळ मदतीवर अवलंबून न ठेवता त्यांच्या हाताला काम आणि उत्पन्नाचे साधन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
शेतकरी व ऊसतोड कामगारांच्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण
शेतकरी तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यालाही या उपक्रमातून नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाणार आहे. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, कृषी विभाग तसेच अग्रवाल युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना कर्जवसुलीचा तगादा लावू नये; बँकांना निर्देश
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवरील आर्थिक आणि मानसिक ताण वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना पीककर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना तगादा लावू नये, असे निर्देश दिले आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणे आवश्यक असून, कर्जवसुलीच्या दबावातून त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही भूमिका घेतली आहे.
चारा उपलब्धता, पाणीपुरवठा आणि जलसंधारणासाठी नियोजन
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा उपलब्धता आणि जलसंधारणाच्या कामांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शासकीय जमिनीवर चारा लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले असून, चारा बियाण्यांचे वितरणही करण्यात येणार आहे. जलसंधारणाच्या कामांना गती देऊन पाणीसाठा वाढविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य देत आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी सुट्टीच्या दिवशीही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज केले आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते म्हणाले की, दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मदत करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक बांधिलकी आहे. ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमातून प्रशासन, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती एकत्र येऊन संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी उभे राहत आहेत. आर्थिक मदतीपासून रोजगारनिर्मितीपर्यंत आणि भावनिक आधारापासून स्वावलंबनापर्यंतचा हा प्रयत्न शेतकरी कुटुंबांना पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी निश्चितच बळ देणारा ठरणार आहे.
