Homeऔरंगाबादशिक्षकासह ५० गुंतवणूकदारांना गंडा घालणारा मुख्य सूत्रधार एजाज सलाट गजाआड!

शिक्षकासह ५० गुंतवणूकदारांना गंडा घालणारा मुख्य सूत्रधार एजाज सलाट गजाआड!

शिक्षकासह ५० गुंतवणूकदारांना गंडा घालणारा मुख्य सूत्रधार एजाज सलाट गजाआड!

१ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी
जालना/प्रतिनिधी/ मार्केटिंग क्षेत्रात ‘बाबा ट्रेडिंग’ या नावाने व्यवसाय सुरू करून एफएमसीजी कंपनीत गुंतवणूक केल्यास वर्षभरात तिप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखवत शिक्षकासह सुमारे ५० गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य सूत्रधार मोहम्मद एजाज मोहम्मद रफीक सलाट याला जालना आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर केली आहे.
तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक
       जालना शहरातील शेरसवार नगर येथील तक्रारदार मोहम्मद फेरोज अब्दुल सत्तार हे व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांच्यासह त्यांचे भाऊ आणि जवळच्या इतर गुंतवणूकदारांना ‘बाबा ट्रेडिंग’ व एफएमसीजी कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास वर्षभरात गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम परत मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. मात्र, पैसे गोळा केल्यानंतर संबंधित आरोपी पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
       याप्रकरणी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१६(४), ३१६(५), ३१८(४), ३५१(२), ३५२, ६१(२), ३(५) तसेच एमपीआयडी कायद्याच्या कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
यापूर्वी दोघांना अटक
       या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी वसीम अहमद अब्दुल गफार (वय ३७, रा. इतवार गल्ली, कचेरी रोड, जुना जालना) आणि मोहम्मद युनुस अहमद मोहम्मद सलीम (वय ३४, रा. इतवार गल्ली, कचेरी रोड, जुना जालना) या दोघांना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अटक केली होती. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन आदेशानुसार कारागृहात आहेत.
        दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मोहम्मद एजाज मोहम्मद रफीक सलाट हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. तो मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.
गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईतून अटक
        आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय पद्धतीने तपास सुरू ठेवत खबऱ्यामार्फत आरोपी मुंबईतील वांद्रे परिसरात असल्याची माहिती मिळवली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पथकाने निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोधमोहीम राबवली. निर्मलनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब कदम, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे आणि त्यांच्या पथकाच्या मदतीने मुख्य आरोपी एजाज सलाट याला रात्री एक वाजता अटक करण्यात आली.
       आरोपीला जालना येथे आणून अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयातील एमपीआयडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तपासासाठी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता
      वर्षभरात गुंतवणुकीच्या तिप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याने या प्रकरणात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ‘बाबा ट्रेडिंग’ किंवा संबंधित एफएमसीजी कंपनीमध्ये आरोपींच्या आमिषाला बळी पडून ज्यांनी गुंतवणूक केली असेल, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, जालना येथे संपर्क साधून आपले तक्रार अर्ज सादर करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
        ही कारवाई जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के, पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, श्रेयस वाघमारे, गोविंद दराडे आणि महिला पोलीस अंमलदार मंदा नाटकर यांनी सहभाग घेतला.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments